गेल्या काही दिवसांपासून अनेक नव नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी या तिन्ही चॅनेलमध्ये TRP साठी जणू काही शर्यतच सुरु असते. TRP च्या शर्यतीत टिकण्यासाठी प्रत्येक चॅनेल, प्रत्येक मालिका अतोनात कष्ट घेत असतात. काही मालिकांचा TRP कमी असल्याने त्या मालिका खूप कमी कालावधीत प्रेक्षकांचा निरोप घेतात. पण काही मालिका मात्र वर्षानुवर्षे सुरूच असतात. अनेक वर्ष मालिका सुरु राहून देखील प्रेक्षकांचं प्रेम कमी होत नाही. पण काही मालिका अशादेखील असतात ज्या TRP च्या शर्यतीत अग्रगण्य असतात, पण मालिकेची कथा संपल्याने त्या बंद होतात. अशा अनेक मालिका आहेत ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल होत. पण कथा संपल्याने त्या बंद झाल्या आहेत. तर मागील काही दिवसांपासून अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आणि त्या जागी अनेक नवीन मालिका आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून झी मराठी आणि स्टार प्रवाह यांनी TRP च्या बाबतीत कलर्स मराठीला मागे टाकले आहे. तर आता कलर्स मराठी देखील पुन्हा एकदा TRP च्या शर्यतीत बाजी मारण्यासाठी सज्ज झाली आहे. कलर्स मराठीवर आता नवनवीन मालिका येत आहेत. नुकतीच ‘इंद्रायणी’ ही मालिका कलर्स मराठी घेऊन आली आहे. तर आता कलर्स मराठी आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीच्या हेड प्रोग्रामिंग पदी केदार शिंदे यांची निवड झाली आहे. केदार शिंदे यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ती मालिका म्हणजे ‘सुख कळले’. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. संसारामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात देत, घरच्या सगळ्या मंडळीना एकत्र ठेवत सुखी राहणे कसे असते हे या मालिकेत दिसून येणार आहे. तर नुकतच या मालिकेच्या शुटींगला देखील सुरवात झाली आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीने शुटींगच्या पहिल्या दिवसाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्पृहाने खाली लिहिले आहे की, “आणि ‘सुख कळले’चे शूट सुरु झाले… शुटच्या पहिल्या दिवसाची एक छोटीशी झलक…”
दरम्यान या मालिकेत स्पृहा आणि सागर यांच्या सोबत अभिनेत्री स्वाती देवल देखील दिसणार आहे. आणि खास गोष्ट म्हणजे स्वातीचा मुलगा म्हणजेच स्वराध्य देवल देखील या मालिकेत दिसणार आहे. स्वराध्यची ही पहिलीच मालिका असणार आहे. या मालिकेतून स्वराध्य मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. यांच्या सोबतच मिमी खडसे ही बालकलाकर म्हणून दिसणार आहे. या मालिकेची निर्मिती सोहम प्रोडक्शन करणार असून, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि सुचित्राचा मुलगा म्हणजेच सोहम बांदेकर हे या मालिकेचे निर्माते असणार आहेत. येत्या २२ एप्रिल पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.