सोनाली कुलकर्णी: सिनेसृष्टीतील कलाकारांवर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमुळे कलाकारांना एक विशेष ओळख निर्माण होते. फक्त स्क्रीनवर नाही तर स्क्रीनच्या मागे देखील आपल्या लाडक्या कलाकारांवर त्यांचे चाहते भरभरून प्रेम करत असतात. कलाकरांच्या वैयक्तिक आयुष्यात नक्की काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
कलाकारांनी केलेल्या ट्रिप्स, कलाकारांचे रिलेशनशिप्स, त्यांचे लग्न, त्यांचे पार्टनर्स, त्यांच्या इतर वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक चाहते सोशल मीडियावर आपल्या कलाकारांना फॉलो करत असतात. तर काही कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सुख दुःखाच्या गोष्टी कधी सोशल मीडियाद्वारे तर कधी एखाद्या इंटरव्ह्यूमधून आपल्या लाडक्या प्रेक्षकांसमोर मांडत असतात. अशातच कलाकारांचे लग्न आणि त्यांचे पार्टनर्स हा सगळ्या चाहत्यांचा इंटरेस्टिंग विषय आहे. थोडी जरी खबर मिळाली की या कलाकाराचा पार्टनर नक्की कोण आहे आणि तो करतो काय? याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात होते. तर आज आम्ही घेऊन आलो आहोत अशाच एका कलाकाराची कहाणी.
आपल्या सर्वांची लाडकी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni). सध्या ती तिच्या दाक्षिणात्य सिनेमामुळे बरीच चर्चेत आहे. तशी सोनाली सोशल मीडियावर देखील बरीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे चाहते तिच्याबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीने तिच्या नवऱ्याबद्दल सांगितले. यावेळी तिने कुणाल बेनोडेकर दुबईत नक्की काय काम करतो हे सांगितले.
पती कुणाल बेनोडेकरच्या कामाबद्दल सांगताना सोनाली म्हणाली की, “कुणाल एका एजन्सीत लॉस अॅडजस्टर आहे. म्हणजेच तो कंपन्यांचा तोटा शोधून काढतो. बँक किंवा कंपन्यांचा तोटा नेमका कुठे झाला, किती झाला हे तो तपासतो. जेव्हा बँकेत फ्रॉड होतो तेव्हा ते इन्शुरन्स कंपनीकडे जातात. मग इन्शुरन्स कंपनी यांच्या एजन्सीला तोटा शोधायचं काम देते.” तसेच ती पुढे म्हणाली की, “तो खूपच हुशार आहे. आपल्याला त्याचं काम ऐकून फार फॅन्सी वाटतं. तो दुबईला राहत असला तरी मूळचा यूकेचा आहे. त्याला माझ्याबद्दल काहीच माहित नव्हतं. म्हणजे मी मराठीतली एक अभिनेत्री आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. आजही तो माझ्या क्षेत्रापासून दूरच असतो. त्याला फिल्म इंडस्ट्रीशी काहीच देणं घेणं नाही. पण मी जे करते त्यात तो मला कायम पाठिंबा देत असतो. बाकी इथे काय चाललंय, कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याकडे तो लक्ष देत नाही.”
याचवेळी दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला अन् २०२१ मध्ये सोनाली आणि कुणाल यांनी लग्नगाठ बांधली. सोनाली आणि कुणालने अगदी साध्या पद्धतीने दुबईत लग्न केले. कुणाल दुबईत असल्यामुळे सोनाली कधी दुबईत तर कधी भारतात असते.