आपल्या प्रोफेशन लाईफपेक्षा सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. मागच्या दोन दिवसांपासून सर्वत्र सलमान खान बद्दल घडणाऱ्या घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने ई-मेल द्वारे धमकी दिली होती. याप्रसंगी लॉरेन्स बिश्नोईसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बातमी ताजी असतानाच आज पुन्हा सलमान खानला धमकीचा मेल आला आहे. सलमान खानला लिहिलेल्या मेलमध्ये बिश्नोईच्या एका मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला आहे. या मुलाखतीत बिश्नोई अस म्हणाला आहे की, “सलमान खानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली. त्यामुळे आमचा समाज त्याच्यावर चिडला. त्याने आमच्या समाजाची माफी मागावी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्रासोबत माझा काही संबंध नाही.”, असंही तो म्हणाला होता.
दुसऱ्या धमकीच्या पत्रानंतर सलमान खान आणि त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक चौकशी करत प्रकरणाचा खुलासा करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे लवकरच सलमान खानचा किसी का भाई किसी की जान चित्रपटही पुढील महिन्यात एप्रिलमध्ये प्रदर्शित होत आहे. साधारणत: चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक महिना आधी प्रमोशन सुरू होते, अशा परिस्थितीत आता पोलीस अभिनेत्याच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत.