अभिनेता जितेंद्र जोशी मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. ते म्हणजे त्याने केलेली कविता. त्याने त्याच्या आईसाठी एक भावुक कविता केली होती. ती सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे, ते म्हणजे त्याच्या नवीन चित्रपटामुळे.
जितेंद्र जोशीने आता पर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट केले आहेत. ‘दुनियादारी’, ‘काकण’, ‘गोदावरी’, ‘पोस्टर गर्ल’, ‘तुकाराम’ असे अनेक चित्रपट केले आहेत. जितेंद्र जोशी आता रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी निर्मित ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जितेंद्रने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
“एक दिवस रोहित शेट्टी सरांच्या कार्यालयातून संपर्क होतो, बोलावलं जातं, समोर स्वतः रोहित सर आणि त्यांच्यासोबत विहान सूर्यवंशी नावाचा एक तरुण दिग्दर्शक. रोहित सर प्रेमाने सिनेमा करण्याची गळ घालतात परंतु विहानच्या तोंडून कथा ऐकल्यानंतर एक उत्तम प्रेमळ गोष्ट ऐकल्याचा आणि त्या गोष्टीतल्या तरुणाच्या प्रेमळ चाचाची भूमिका करण्याची अनोखी संधी मिळाल्याचा आनंद होतो.
चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात उत्तम पार पडतं . मध्ये अनेक दिवस जातात आणि अचानक फोनवर समजतं की चित्रपट प्रदर्शित होतोय. एकीकडे आपण वेगळ्याच चित्रपटाचं हिमाचल प्रदेश येथे चित्रीकरण करताना या छोट्याशा ट्रेलर सोबत पुन्हा कोल्हापुरात येऊन धडकतो. चित्रपट या माध्यमाची हीच कमाल आहे. खरं तर तेजस्वी, करण आणि विहान या तिघांचा हा पहिला मराठी चित्रपट परंतु प्रदर्शित जरा वेळाने होतोय कारण चांगल्या गोष्टी मुरायला आणि साध्य व्हायला वेळ लागतोच. सर्वाँना शुभेच्छा!! कसा वाटतोय ट्रेलर कळवा”, असं जितेंद्रने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटच दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केलं आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशीसह अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, करण किशोर, वनिता खरात, प्रसाद जवादे हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आणखीनच उत्सुक झाले आहेत, चाहते जितेंद्रच्या पोस्ट खळी भरभरून कमेंट करत आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.