मराठी आणि हिंदी सिनेमे आणि मालिकांतून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ‘उत्तरा बावकर’ यांचे आज (१२ एप्रिल रोजी ) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. उत्तरा बावकर यांनी वयाच्या ७९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
उत्तरा बावकर यांनी १९८६ मध्ये ‘यात्रा’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनतर त्यांनी काम केलेल्या ‘तमस‘या मालिकेतून त्या प्रसिध्दीच्या झोतात आल्या. तसेच त्यांनी ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी सिनेमात तर ‘दोघी’, ‘वास्तूपुरुष’, ‘उत्तरायण’, ‘शेवरी’, ‘रेस्टोरेंट’ यांसारख्या मराठी सिनेमांत त्या झळकल्या होत्या.
अभिनयाबरोबरच त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले. उत्तरा बावकर यांना त्यांच्या कारकीर्दीच्या काळात १९८४ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर १९८८ साली सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता.
अभिनेत्री उत्तरा बावकर मागील काही दिवसांपासून काही ना काही आजाराशी लढत होत्या. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.