बॉलिवूडचा खिलाडी म्हणून जगभरात ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार. कॉमेडी सिनेमा असो वा ॲक्शन सिनेमा त्याने कायमच जबरदस्त काम केले आहे आणि बॉक्स ऑफिसवर हाऊसफुलचा बोर्ड लावण्यात यशस्वी ठरला आहे.
असे असूनही अक्षयचे मागील काही वर्षांत आलेल्या सिनेमांपैकी काही सिनेमे हिट ठरले तर काही फ्लॉप. अक्षय कुमारचा गुड न्यूज आणि सूर्यवंशी या सिनेमा नंतर आलेले बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, राम सेतु, सेल्फी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अपयशी ठरले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे त्याच्याच ‘रावडी राठोड’ या सुपरहिट सिनेमाच्या सिक्वेलमधून अक्षयचा पत्ता कट झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
२०१२ साली प्रदर्शित झालेला रावडी राठोड हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीमुळे चांगलाच गाजला. तर आता १० वर्षांनंतर या सिनेमाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या सिक्वेलवर सध्या निर्माते काम करत आहेत. ही बातमी पसरताच सिनेमातील सर्वात प्रमुख भूमिका म्हणजे पोलीस अधिकाऱ्याची भूमिका नक्की कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी सर्वच फार उत्सुक होते.
या भूमिकेसाठी ‘सिध्दार्थ मल्होत्रा’ला विचारणा करण्यात आली आहे आणि सिध्दार्थने देखील या सिनेमासाठी आवड दर्शवली आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि निर्माते यांच्यात यावर बोलणी सुरू आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ अक्षय कुमारची जागा घेणार की रावडी राठोडच्या सिक्वेलमध्ये ते दोघेही एकत्र दिसणार हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
या सिनेमाचे शूटिंग मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणारा काळच सर्व प्रश्नांची उत्तरे देईल हे नक्की.