सध्या मराठी सिनेसृष्टीत चर्चा सुरू आहे ती ‘महाराष्ट्र शाहीर‘ या सिनेमाची. केदार शिंदे दिग्दर्शित हा सिनेमा येत्या २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शाहीर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध गायक, नाटककार, पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर भरभरुन कौतुक झाले ते ‘अंकुश चौधरी’चे.
महाराष्ट्र शाहीरमध्ये अंकुश शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील त्याचा लूक पाहून सर्वचजण भारावून गेले आहेत. अंकुशने त्याचा या खास लूकसाठी खूप मेहनत घेतली आहे, ज्याचा खुलासा त्याने आजपर्यंत कधीही केलेला नाही. परंतू त्याच्या पत्नीने म्हणजेच दीपा चौधरी यांनी सिनेमाच्या सुरुवातीपासूनच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
दीपा यांनी सांगितले की, अंकुशने वजन जेव्हा कमी केलं तेव्हा सगळे विचारत होते, तू वजन कमी का केलं? मात्र त्यावेळी आम्ही कोणालाच काही सांगितलं नाही. ढोलकी वाजवायला तो शिकला. गाणी गायचा. बाथरुममध्येही तो गाणी गात होता. आम्ही विचार करायचो की, याचं नेमकं काय सुरू आहे?”.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “मलाही त्याच्या या चित्रपटाबाबत आधी काहीच माहित नव्हतं. जेव्हा मला केदार शिंदे यांचा फोन आला तेव्हा त्यांनी मला या चित्रपटाबाबत सांगितलं. अंकुश स्वतःहून कोणती गोष्टी सांगत नाही हा त्याचा स्वभाव आहे. पण तीन वर्षे त्याने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो याच गोष्टीच्या पाठी होता. सतत या चित्रपटाचाच विचार तो करत होता. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिल्यानंतर त्याची मेहनत माझ्या डोळ्यासमोरुन गेली. त्याने खूप कष्ट केले आहेत”.
एक सिनेमा पण त्या सिनेमामुळे आपण आणि आपले जीवन खरोखरच बदलत असते हे नक्की. त्यामुळे आता हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.