‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका असून ती मालिका कॉमेडी साठी प्रसिद्ध आहे. पण सध्या त्या मालिकेचा निर्माता असित मोदी यांचे ग्रह फिरले असून काही दिवसांपासून त्यांच्यावर मालिके मधलेच कलाकार वेगवेगळे आरोप करताना दिसून येत आहेत. त्या मालिकेच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ती मालिका अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्यात मालिकेच्या सेटवरील वातावरण देखील बिघडले आहे.
‘तारक मेहता’ या मालिकेत सोधीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने निर्मात्यावर म्हणजेच असित मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला असून पोलिसांनी असित मोदींच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. गेल्या खूप दिवसांपासून असित मोदी यांच्यावर असे गंभीर आरोप होत असून मालिकेतील कलाकारांनी त्यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
निर्मात्या सोबतच तिने मालिकेतील कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात देखील तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांच्या सांगण्यानुसार असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्या विरोधात कलम 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अजूनही या प्रकरणाबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.