मागील काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या सर्वांचे लाडके कलाकार एकामागोमाग एक काही ना काही आनंदाची बातमी देत आहेत. कोण घर घेतंय, कोण गाडी घेतंय, कोण लग्न करतंय तर कोणाच्या घरी नव्या लहानग्या पाहुण्याचे आगमन होत आहे. आता अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने देखील नुकतीच एक गोड बातमी दिली आहे.
सध्या यामी आणि तिचा पती म्हणजेच दिग्दर्शक आदित्य धर हे दोघेही त्यांच्या आगामी ‘आर्टिकल ३७०’ या सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमाच्या सेटवर पहिली भेट झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली अन् ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षांच्या डेटिंगनंतर त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आणि २०२१ मध्ये यामीने आणि आदित्यने लग्नगाठ बांधली. तर आता त्यांच्या लगनाला जवळपास ३ वर्षे पूर्ण होत आहेत. लग्नाच्या तीन वर्षांनंतर यामी आणि आदित्य आई-बाबा होणार आहेत.
यामी आणि आदित्य हे कपल चांगलेच लोकप्रिय आहेत. अनेकदा ते दोघे एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी यामी तिच्या पतीसह म्हणजेच आदित्यसोबत स्पॉट झाली होती, तेव्हा तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. एवढंच नाही तर तिच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळेच तेज होते. त्या दरम्यान यामीने ओढणीच्या आधारे तिचे पोट झाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासूनच यामी प्रेग्नंट असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावर यामी आणि आदित्य या दोघांनीही मौन बाळगले होते.
आज आर्टिकल ३७० या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजच्या निमित्ताने यामी आणि आदित्य हे दोघेही आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हा सिनेमा येत्या २३ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या प्रमोशनसाठी यामी नक्कीच मैदानात उतरेल अशी सर्वांना आशा आहे. आजच्या सोहळ्यात यामी आणि आदित्य यांच्याकडे पाहून यामी खरंच प्रेग्नंट आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच जेव्हा त्यांना याबाबत विचारण्यात आले, तेव्हा आदित्यने त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यामुळे सध्या त्या दोघांचे चाहते भलतेच खुश आहेत.
आज ट्रेलर रिलीजला यामीला पाहून अनेकांनी अंदाच बांधले, त्यानुसार यामीच्या प्रेग्नंसीला आता जवळपास साडेपाचहून अधिक महिने झाले आहेत. यामीच्या प्रेग्नंसीची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीतून आणि त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.