मराठी सिनेसृष्टीत सध्या एका मागोमाग एक आपले अनेक लाडके कलाकार आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सर्व कलाकार चांगलेच चर्चेत आहेत. आता आणखी एक अभिनेत्री नवरी होणार आहे, तर ती अभिनेत्री म्हणजे ‘तितीक्षा तावडे’ (Titeeksha Tawade). तिच्यासोबत लग्नगाठ बांधण्यासाठी बोहल्यावर चढणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke).
मागील काही दिवसांमध्ये स्वानंदी – आशिष, मुग्धा – प्रथमेश, गौतमी – स्वानंद, अमृता – प्रसाद शिवानी आणि अजिंक्य हे सारे कलाकार नुकतेच लग्नबंधनात अडकले. अचानक लग्नाची बातमी देत तितीक्षा तावडेने चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली. त्यामुळे सर्वत्र त्यांचेच कातुक सुरु आहे.
तितीक्षा आणि सिद्धार्थने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तितीक्षाने आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच तितीक्षाने क्रिकेटर ‘मिताली राज’च्या आयुष्यावर आधारित ‘शाबाश मिथू’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तर सिध्दार्थ ‘दृश्यम २’मध्ये दिसून आला होता. तर नुकताच तो ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात देखील झळकला. तसेच ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेमुळे देखील सिद्धार्थ मागील काही दिवसांत चांगलाच चर्चेत होता.
View this post on Instagram
तितीक्षा आणि सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. त्यामुळे ते दोघे डेट करत आहेत अशी शंका त्यांच्या चाहत्यांना होतीच. पण त्या दोघांनी कधीच याबाबतीत काही भाष्य केले नव्हते. आता त्यांनी थेट स्वतः पोस्ट करत या शंकेवर शिक्कामोर्तब केले. तितीक्षाने तिच्या इंस्टाग्रामवर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली आहे. तर सिध्दार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. या फोटोच्या खाली तितीक्षाने लिहिले की, “त्याने मला डेटसाठी विचारलं होतं, पण त्याचं रुपांतर केळवणात झालं.” त्यावरून हा फोटो त्यांच्या केळवणाचा आहे हे स्पष्ट झालंय.
तितीक्षाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी भरभरून कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या. यामुळे चाहते प्रचंड खुश आहेत. आता लवकरच या दोघांच्या घरी कधी सनईचे सूर गुंजणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.