बिग बॉस हिंदी असो वा मराठी, हा शो कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच बिग बॉसचे ओटीटीवरील पहिले पर्व देखील चांगलेच गाजले. तर आता लवकरच पुढील पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
शोच्या पहिल्या पर्वात कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सुप्रसिध्द दिग्दर्शक करण जोहर याच्यावर होती. परंतू दुसऱ्या पर्वात मात्र करण जोहरचा पत्ता कट झाला आहे. कारण ‘बिग बॉस ओटीटी २’ हा शो सलमान खान होस्ट करणार आहे.
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वात शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद, जीशान खान, निशांत भट, प्रतीक सेहजपाल आणि नेहा भसीन यांसह एकूण १५ स्पर्धकांनी शो मध्ये रंगत आणली. तर अभिनेत्री ‘दिव्या अग्रवाल’ पहिल्या पर्वाची विजेती झाली.
नुकतंच बिग बॉस ओटीटी २ चे अँथम साँग आणि प्रोमो देखील प्रदर्शित झाले. त्यानुसार बिग बॉस ओटीटी २ मध्ये जंगल थीम असणार आहे हे तरी स्पष्ट समजले आहे. तर आता या सिझनमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. तर काही संभाव्य नावे देखील समोर येत आहेत. यंदाचे हे पर्व आणखीन लोकप्रिय व्हावे यासाठी यावेळी ॲडल्ट स्टार मिया खलिफा, कॉमेडियन कुणाल कामरा, राज कुंद्रा तसेच श्रीलंकन गायक योहानी यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे.
यापैकी मिया खलिफा च्या नावाची मात्र जोरदार चर्चा रंगली आहे. यापूर्वी हिंदी बिग बॉसच्या नवव्या पर्वात अभिनेत्री सनी लिओनी हिला देखील ॲडल्ट इंडस्ट्रीमधून रिऍलिटी शोमध्ये आणले होते. त्यामुळे मिया देखील बिग बॉस ओटीटी २ मध्ये दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा : Top 5 Things to Know About Gadar’s Re-Release
तसेच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात दोषी आढळून आल्यामुळे अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात राज तीन महिने तुरुंगात देखील होता. या शोमध्ये आल्यामुळे राज कुंद्रा याला त्याची बाजू मांडण्याचा किंवा प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यासाठी आणखी एक संधी मिळेल अशी शक्यता निर्मात्यांनी वर्तवली आहे. परंतू शोमध्ये नक्की कोणते कलाकार सहभागी होणार हे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले नाही.
बिग बॉस ओटीटी २ची सुरुवात ही येत्या १७ जूनपासून होणार आहे. त्यामुळे आता या शोच्या चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.