सध्या देशभरात ऐतिहासिक सिनेमांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून सुप्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे.
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा सिनेमा कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. नव्या रूपातील ट्रेलर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला. तर आता हा सिनेमा येत्या १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आदिपुरुष हा सिनेमा संपूर्णपणे रामायणावर आधारित आहे. या सिनेमामध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रभासने प्रभू रामाची, सनी सिंगने लक्ष्मणाची, क्रिती सेननने सीता माईची आणि सैफ अली खानने रावणाची तर आपल्या मराठमोळ्या देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी या सिनेमातील अनेक कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी उपस्थित राहत आहेत. मात्र इतक्या दिवसांपासून सुरू असलेल्या प्रमोशनच्या कार्यक्रमांमध्ये रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान मात्र कुठेही आढळून आलेला नाही. त्यामुळे ठरवून निर्मात्यांकडून सैफला प्रमोशनपासून दूर ठेवण्यात आले आहे असा अंदाज सध्या नेटकरी लावत आहेत.
याबद्दल अधिकृतरित्या कोणतेही कारण स्पष्ट झाले नसले तरी प्रेक्षकांनी मात्र अनेक तर्क लावले आहेत. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये देखील शेवटी अगदी काही सेकंदासाठीच सैफचा लूक पाहायला मिळाला. त्यामुळे एक युजर म्हणाला की, “सेफ प्ले करण्यासाठी ही युक्ती लढवली आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, “चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जय श्रीरामच्या घोषणा झाल्या तर सैफ त्याच्या धर्मामुळे काही करणार नाही.” तर काहींना असे वाटते की सैफ पुन्हा काही नकारात्मक वक्तव्य करेल आणि त्याचा थेट परिणाम सिनेमावर होईल म्हणून सैफला या सर्व गोष्टींपासून मुद्दाम लांब ठेवण्यात आले आहे.
तर हा सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत आणि त्यानंतर आणखी कोणत्या नवीन वादाला तोंड फुटणार हे येणारा काळच सांगेल.