बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर सध्या कोणत्याही सिनेमामध्ये दिसत नसली तरी ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत जोडलेली असते.
सोनम तिच्या सिनेमामुळे फारशी चर्चेत नसली तरी ती तिच्या नवनवीन फॅशन ट्रेंड्समुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी तिच्या फॅशनचीही चर्चा नाही तर आता तिच्या चर्चेचे कारण काहीतरी वेगळेच आहे. त्याचे कारण म्हणजे येत्या ७ मे रोजी किंग चार्ल्सच्या राज्यभिषेक कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्याची संधी संपूर्ण सिनेसृष्टीतून आणि संपूर्ण भारतातून सोनमला मिळाली आहे.
किंग चार्ल्स थ्री यांचा कॉरोनेशन कॉन्सर्ट युनायटेड किंगडममधील विंडसर कॅसल येथे ७ मे रोजी पार पडणार आहे. किंग चार्ल्स III च्या राज्याभिषेकाच्या मैफिलीबद्दल बोलायचं तर, ६ मे रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राजा आणि राणीच्या राज्याभिषेकानंतर ७ मे रोजी विंडसर कॅसल येथे पार पडणार आहे.
ही आनंदाची बातमी देताना सोनम म्हणाली की, “किंग चार्ल्सचे संगीत आणि कलेबद्दलचे प्रेम साजरा करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमासाठी कॉमनवेल्थ व्हर्च्युअल कॉयरमध्ये सामील होण्याचा मान मिळाला. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे”
Hugh Bonneville द्वारे आयोजित या मैफिलित २०,००० सार्वजनिक सदस्य आणि आमंत्रित अतिथी, तसेच जगभरातील लाखो लोक सहभागी होणार आहे. तसेच सेलिब्रेटरी कॉन्सर्टमध्ये कॅटी पेरी, लिओनेल रिची, अँड्रिया बोसेली, सर ब्रायन टेरफेल, फ्रेया राइडिंग्स, अॅलेक्सिस फ्रेंच यांसारखे कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.