मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक सिनेमे आणि चरित्रपटांची मालिकाच सुरू आहे. एका मागोमाग एक नवनवीन सत्य घटनेवर आधारित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच हे सिनेमेदेखील प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.
अनेक चरित्रात्मक भूमिका साकारत सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे ‘रणदीप हुड्डा.’ २००१ साली ‘मॉन्सून वेडिंग’ या सिनेमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रणदीपने ‘डरना जरुरी है’, ‘रिस्क’, ‘साहेब बीवी और गँगस्टर’, ‘जन्नत २’, ‘हिरॉईन’ यांसारख्या अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच ‘सरबजीत’ या चरित्रपटातील त्याची कामगिरी उललेखनीय होती.
तर यापूर्वी रणदीप हुड्डाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमात क्रांतिवीर सावरकरांची भूमिका साकारली. फक्त भूमिकाच साकारली नाही तर या सिनेमाचे दिग्दर्शनही त्यानेच केले. काही दिवांपूर्वीच ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी वाहिनीवरून रणदीप पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘इन्सपेक्टर अविनाश’ या वेबमालिकेतून त्याने पुन्हा एकदा चरित्रपटात काम केले.
‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबमालिकेत अविनाश मिश्रा यांची पोलीस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका रणदीप चड्डा याने साकारली. इन्सपेक्टर अविनाश या वेबमालिकेच्या निमित्ताने बोलताना चरित्रपटात साकारल्या जाणाऱ्या भूमिकेबद्दल त्याने सांगितले.
तेव्हा रणदीप हुड्डा म्हणाला की, “चरित्र भूमिका साकारणे ही कलाकारावर खूप मोठी जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी अविनाश यांची अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टर अविनाश या वेबमालिकेचे कथानक उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. मुळात ज्यावेळी मी अविनाश यांच्याबद्दल माहिती मिळवत गेलो आणि अभ्यास करत गेलो त्यावेळी मला असे लक्षात आले की एखादी व्यक्ती ज्यावेळी या जगातून निघून जाते त्यावेळी खरे तर त्यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट किंवा मालिका तयार केली जाते. परंतु माझ्या वाटेला अविनाश यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांच्या हयातीतच मिळाली. त्यामुळे मला त्यांचे जीवन जवळून पाहता, अनुभवता आले.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “चरित्रपट किंवा मालिका साकारताना त्या व्यक्तीचे जीवन अथवा त्या व्यक्तीचे कार्य हे कोणी लिहून ठेवलेल्या लिखाणामधून अथवा कोणाकडून ऐकून समजते. मात्र, या वेब मालिकेचे वैशिष्टय़च असे होते की इन्स्पेक्टर अविनाश यांनी त्यांच्या कारकीर्दीत गुन्हेगारांशी केलेले दोन हात, त्यांनी केलेल्या कठोर कारवाया या त्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यानुसार माझा या व्यक्तिरेखेबद्दलचा अभ्यास अधिक दृढ होत गेला.”
तसेच रणदीप शेवटी म्हणाला की, “चरित्रपट अथवा मालिका ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, त्या व्यक्तीची विचारधारा, मानसिक, बौद्धिक क्षमता यांचा सारासार विचार करणे ही एका उत्तम अभिनेत्याची जबाबदारी आहे.”
रणदीप हुड्डाची नीरज पाठक दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर अविनाश’ ही वेबमालिका १८ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.