मराठी पाऊल पडते पुढे असे आपण अनेकदा अभिमानाने म्हणत असतो, ऐकत असतो. तर मागील काही दिवसांपासून आपण हे वाक्य आपल्या काही लाडक्या अभिनेत्रींसाठी उद्गारताना अनुभवले आहे. त्याचे कारणही अगदी तसेच आहे.
आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी अभिनयासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. तर काहींनी व्यवसाय क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्राजक्ता माळीने तिचा दागिन्यांचा ब्रँड, तेजस्विनी पंडित आणि आभिज्ञा भावे यांनी कपड्यांचा नवीन ब्रँड यापूर्वी सुरू केला आहे. तर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील गोड अभिनेत्री अवनी म्हणजेच ‘साक्षी गांधी’ हिने अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आता तिने देखील अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
साक्षीने खास उन्हाळा सिझनमध्ये जगप्रसिद्ध रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. तर तिच्या व्यवसायाअंतर्गत विक्री होणारे सर्व आंबे हे नैसर्गिकरित्या पिकवलेले असणार असे सांगितले आहे. तसेच तिने ग्राहकांना अनेक ऑफर्सही दिल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे “ज्यांच्या ऑर्डर्स चार डझनपेक्षा जास्त असतील, त्यांच्या घरी मी स्वतः आंबे डिलीव्हर करायला जाणार आहे.” असे साक्षी ने सांगितले.
साक्षीच्या या नवीन व्यवसायासाठी ‘सावनी मँगोज्’ हे नाव दिले. तर या नावामागील गुपितही तिने सांगितले. तेव्हा ती म्हणाली की, “माझं मालिकेतील नाव अवनी आहे व खरं नाव साक्षी आहे. अवनी नावाने मला महाराष्ट्रभरातून प्रेम मिळवून दिलं, त्यामुळे अवनी व साक्षी या दोन नावातून सावनी हे नाव तयार करून मी व्यवसायासाठी निवडलं.”
साक्षीच्या या नवीन स्टार्ट-अपसाठी सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.