‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या लोकप्रिय शोचं नाव ऐकलं की, आपल्याला सर्वात आधी आठवतात ती या शोमुळे महाराष्ट्राला मिळालेली पंचरत्ने. जरी गेल्या अनेक वर्षांत या शोचे नवनवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले असले तरी या शोचा पहिला सिजन आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. तर या शोमधील गाजलेले आणि आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक जोडी म्हणजे रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar).
जवळपास तीन वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली २३ जानेवारी २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. ते दोघेही सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूपच आवडते. आधी रोहित आणि जुईली या दोघांची मैत्री झाली अन् हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं हे आपणासर्वांना आधीपासूनच माहित आहे. पण त्यांची मैत्री कशी झाली? हे त्या दोघांनी नुकतंच सांगितलं आहे. रोहित आणि जुईलीने नुकतीच सुलेखा तळवलकर यांना मुलाखत दिली. तर या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मैत्रीचा किस्सा सांगितला.
तर हा किस्सा सांगताना रोहित सुरुवातीला म्हणाला की, “मला मुली म्हणजे एलियन प्रकार वाटायचा. कारण- मी मुलांच्या शाळेत शिकलेलो. आमच्या शाळेत मुलं-मुलं वेगळी आणि मुली-मुली वेगळ्या. तर हाय, हॅलो, बाय हे कसं होतं माहीत नव्हतं. तर मला ना फक्त एकच माहीत होतं की, खोड्या काढायच्या म्हणजे आपल्याकडे लोक लक्ष देतील. तर सारेगमपच्या वेळेस मी तालीमला धावत धावत जायचो आणि ही दोन वेण्या वगैरे बांधायची. मग मी एक वेणी अशी सटकन खाली खेचून पळत सुटायचो.”
जुईली हा किस्सा पुढे सांगत म्हणाली, “हा मागून कुठून तरी जाताना एक वेणी खेचायचा, दुसरी वेणी खेचायचा आणि एके दिवशी मी रडायलाच लागले. त्या वेळेस आमची जास्त ओळख नव्हती. पण, मग मी आईला जाऊन याचं नाव सांगितलं की, हा असा मुलगा आहे आणि हा मला खूप जास्त त्रास देतोय. आणि मग आईनं त्याला हॉटेलवर बोलावलं. आम्ही तेव्हा ग्रुमिंग सेशनसाठी हॉटेलमध्ये होतो. आईनं रोहितला रूममध्ये बोलावलं आणि त्याला खूप झापलं. डोळे मोठे करून ती बोलत होती की, असं नाही करायचं. मग तो म्हणाला की, हो असं नाही करत; पण मला खेळायचंय हिच्याशी म्हणून मी असं करतोय.”
त्यावर रोहित म्हणाला की, “मी कोणालाच ओळखत नाही इकडे आणि ही माझ्या एपिसोडला आहे ना. त्यामुळे मला हिच्याशी हाय, हॅलो किंवा आपण खेळू या का? असं सगळं बोलायचंय, असं मी तिच्या आईला सांगितलं होतं.”
तर अशी गोड, खट्याळ अन् गमतीशीर पद्धतीने रोहित आणि जुईलीच्या मैत्रीची सुरुवात झाली होती.