रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवण्यासाठी छोट्या पडद्यावरील मालिका नवनवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतात. केवळ नवा विषयच नाही तर, मागील काही महिन्यांपासून मालिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात. असाच एक नवा प्रयोग एका आगामी मालिकेत करण्यात आला आहे. ती मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणारी ‘येड लागलं प्रेमाचं.’ या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
या मालिकेतून विशाल निकम आणि पूजा बिरारीची ही नवी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या नावावरूनच या मालिकेत प्रेमकहाणी पाहायला मिळणार हे आपसूक लक्षात येते. तर आता काही दिवसांपूर्वी या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यात बैलगाडा शर्यत दाखवली आहे. तर पहिल्यादांच या मालिकेतून बैलगाडा शर्यतीचा प्रयोग पाहायला मिळणार आहे. पण आणखी एक खास गोष्ट म्हणजे यावेळी बैलगाड्याचा दोर विशालच्या हाती नाही तर पूजाच्या हाती पाहायला मिळाला. त्यामुळे मालिका प्रदर्शित होण्याआधीच या मालिकेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
तर हा सीन कसा शूट झाला, हे पूजाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितले. तेव्हा पूजा म्हणाली की, “बैलगाडा शर्यत शूट करायची असं ठरल्यापासून मनात खूप उत्सुकता होती. मी कधीच बैलगाडी चालवली नाहीय. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची खुपच उत्सुकता होती. पंढरपुरात आम्ही ही बैलगाडा शर्यत शूट केली. जवळपास 4 ते 6 दिवस या भागाचं शूट सुरु होतं. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत आम्ही याच सीनवर मेहनत घेत होतो. मात्र, टीममधल्या कुणाच्याही चेहऱ्यावर थकल्याचे भाव नव्हते. सीन अधिकाधिक चांगला कसा होईल याकडेच सर्वांचं लक्ष होतं. बैलगाडी चालवणं हे मोठं आव्हान तर होतंच पण त्यासोबतच बैलांसोबत जुळवून घेणं म्हणजे तारेवरची कसरत होती. बैलगाडी नुसती चालवायची नव्हती तर ती शर्यतीत पळवायची होती. त्यामुळे खूप काळजी घेऊन शूट करावं लागत होतं.”
तसेच पुढे ती म्हणाली, “आमच्या टीमने सर्वांचीच उत्तम सोय केली होती. दिग्दर्शकासोबतच बैलांच्या खऱ्या मालकांनी देखिल मला बैलगाडी चालवण्याचे धडे दिले. मी हा सीन बॉडी डबलची मदत न घेता केला. शूटिंगच्या दिवशी सगळे गावकरी हा सीन पाहाण्यासाठी जमले होते. खरतर खूप वेळा रिटेक्स झाले. मात्र, आम्ही सर्वांनी हा सीन हताश न होता पूर्ण केला. मालिकेतला राया म्हणजेच अभिनेता विशाल निकमनं या सीनसाठी मला खूप मदत केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बैलांसोबत मी हा सीन शूट केला त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांची मी नेहमी ऋणी असेन. माझ्यासाठी हा अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव होता. हा अनुभव माझ्या आठवणींच्या शिदोरीत कायम असेल. हा सीन स्क्रीनवर कसा दिसणार हे पहाण्यासाठी मी उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.”
त्यामुळे सध्या प्रेक्षकवर्गात या मालिकेसाठी प्रचंड उत्सुकता आहे.