‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी भारतातच नाही तर संपूर्ण जगभर ओळख असणारे भारतीय राजकारणातील एकमेव व्यक्तीमत्त्व म्हणजे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ‘नितीन गडकरी.’
समाजासाठी नितीन गडकरी यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या वेगवेगळ्या कामांमुळे ते कायम चर्चेत असतात. पण आता मात्र फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर मनोरंजन क्षेत्रातही त्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या आजवरच्या संघर्षावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.
‘गडकरी ते रोडकरी’ हा प्रवास दाखवणारा सिनेमा म्हणजे ‘गडकरी.’ काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले. तेव्हापासून राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात या सिनेमाचीच चर्चा रंगली होती. तसेच या सिनेमात नितीन गडकरी यांच्या भूमिकेत कोण दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र आता ही उत्सुकता संपली आहे, कारण नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लौंच झाला. नागपूर इथे हा सोहळा खूपच जोरात पार पडला.
ट्रेलर लौंच सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच यावेळी सिनेमात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणारा अभिनेता ‘राहुल चोपडा’ देखील उपस्थित होता. गडकरी या सिनेमाची निर्मिती अभिजीत मजुमदार आणि ए. एम. सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख यांनी केली असून अनुराग राजन भुसारी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
गडकरी या सिनेमाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे की, नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिजीत मजुमदार, दिग्दर्शक अनुराग भुसारी, अक्षय देशमुख आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नितीनजींचे आयुष्य आपल्या समोर आणले आहे. त्यामुळे त्यांच्या टीमला आणि कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो. एक सुंदर चित्रपट तुम्ही तयार केला. याचा ट्रेलर बघून आमच्या सगळ्यांच्याच मनात हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. नितीनजींच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे हे तीन तासांमध्ये बांधणे कठीण आहे. नितीन गडकरी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे आयुष्य एका भागात दाखवणे शक्य नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, याचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित व्हावा.”
तर क्रिकेटर उमेश यादव यांनी देखील आपले मत मांडले. तेव्हा ते म्हणाले की, “नितीन गडकरी यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. नागपूरमध्ये ज्यावेळी हायवे झाले, त्यावेळी क्रिकेटर एम एस धोनीनेही त्यांच्या या कल्पनेचे स्वागत केले. भारताला विकासाच्या दिशने नेण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट व्हावा, ही खूप आनंदाची बाब आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे. जेणे करून तरुणाईला एक आदर्श समाजसेवक, नेता काय असतो, याची ओळख होईल.”
तर या सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणले की, “दूरदृष्टीचा विचार करून सदैव कार्यरत असणाऱ्या नितीन गडकरी यांचे देशकार्य, समाजकार्य आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यांची व्यावसायिक कारकिर्द जितकी कौतुकास्पद आहे तितकेच रंजक त्यांचे वैयक्तिक आयुष्यही आहे. नितीन गडकरी आपल्या देशाला प्रगतीपथावर नेत असतानाच त्यांच्या पत्नीने म्हणजेच कांचनताईंनी त्यांच्या घराचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळला. त्यांच्या या यशात कांचनताईंचीही तितकीच मोलाची साथ आहे. गडकरी यांचे मित्रही तितकेच त्यांच्या या यशासाठी कारणीभूत आहेत. नितीन गडकरी यांचा सामान्य मुलगा ते यशस्वी राजकारणी हा प्रवास ‘गडकरी’मध्ये दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांना या निमित्ताने नितीन जयराम गडकरी यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी अवश्य पाहावा.”
गडकरी या सिनेमात राहुल चोपडासह ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर हे कलाकर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर हा सिनेमा येत्या २७ ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.