सध्या सर्वत्र मराठी कलाविश्वातील नवनव्या गोष्टींची चांगलीच चर्चा रंगत आहे. मराठी कलाविश्वात कधी आगळावेगळा विषय, कधी नवखी कथा तर कधी अजबगजब पद्धती अशा अनेक गोष्टी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आता मोठी भर पडली आहे ती आर्टिफिशिल इंटेलिजन्सची म्हणजेच AI ची.
सध्या चालू असणाऱ्या २१ व्या शतकात तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, त्यामुळेच आपण दिवसेंदिवस विकासाची पुढील पायरी चढत आहोत. काही दिवसांपूर्वी आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा गैरवापर करून अनेक अभिनेत्रींचे व्हिडीओ बनवण्यात आले होते. तर याच तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करत आर्टिफिशिल इंटेलिजन्सने तयार केलेल्या फोटोंचा बार्बी ट्रेंड देखील सुरु झाला होता. त्यामुळे आता हे तंत्रज्ञान कलाविश्वात देखील पाहायला मिळाले तरी त्यात फारसं नवल वाटणार नाही.
आता आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करून एक बालनाटक तयार करण्यात आले आहे. हे बालनाट्य लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस या बालनाट्याची घोषणा झाली. अर्थात हे मराठी भाषेतील बालनाट्य असणार आहे. तर आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या या नाटकाचे नाव ‘आज्जीबाई जोरात’ असे आहे. तर या अनोख्या विषयाला हात घालत या नाटकाचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. क्षितीज पटवर्धन यांच्या या नाटकाची नुकतीच घोषणा झाली. घोषणा झाल्यापासून साऱ्या प्रेक्षक वर्गात या नाटकासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचे कारण म्हणजे आज्जीबाई जोरात हे मराठी सिनेसृष्टीतील पहिले-वाहिले AI बालनाट्य आहे.
नेहमीप्रमाणे या बालनाट्यात लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक चेहरा म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत. या नाटकामध्ये निर्मिती सावंत या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर या महाबालनाट्यात निर्मिती यांनी आज्जीबाईंची मुख्य भूमिका साकारली आहे. तर या बालनाट्यातून लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिनय बेर्डे रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अभिनयने यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच या बालनाट्यामध्ये निर्मिती सावंत आणि अभिनय बेर्डे यांच्यासह अभिनेता पुष्कर क्षोत्री, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेत्री मुग्धा गोडबोले हे मराठी कलाविश्वातील दमदार कलाकार देखील या झळकणार आहेत.
पहिल्या AI महाबालनाट्याचा शुभारंभ मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४ वा. दीनानाथ, पार्ले इथे आहे. त्यामुळे सध्या आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करून हे नाटक कसे तयार करण्यात आले असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे या AI बालनाट्याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.