खूपच कमी वयात सारेगमप लिटिल चॅम्प्समधून गायिका म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेली आणि त्यानंतर २०१४ साली रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या टाइमपास या सिनेमातून उत्तम अभिनेत्री म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी ही गोड गायिका आणि नायिका म्हणजे ‘केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar).’
टाइमपास, तानी, शाळा, काकस्पर्श, फुंतरू, अंकुश, पांघरून यांसारख्या सिनेमातून केतकीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्या गाण्याचे देखील वेड लागले आहे. अभिनय आणि गायन अशा दोन्ही क्षेत्रांत कार्यरत राहून आपलं नावलौकिक करणाऱ्या केतकीचे प्रचंड प्रमाणात चाहते आहेत. तसेच मोठ्या संख्येने तिचे चाहते तिला सोशल मीडियावर देखील फॉलो करतात. त्यामुळे केतकी कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. केतकी अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यावर तिला तिचे चाहते भरभरून प्रेम देत असतात. तर दुसरीकडे मात्र काहीजण तिला तिच्या बारीक दिसण्यावरून ट्रोल करतात.
View this post on Instagram
ट्रोलर्सकडून हा प्रकार अनेकदा झाल्याने आता मात्र केतकी संतापली आहे. बॉडी शेमिंग करणाऱ्यांना तिने चांगलेच सुनावले आहे. आता पुन्हा एकदा हा प्रकार घडल्यामुळे पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना तिने उत्तर दिले. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत केतकीने लिहिले की, “प्रिय लोकं ज्यांना माझ्याप्रमाणे कधीकधी बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो, किती बारीक आहेस गं, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारीक होतास, आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, ऑफिस मधले सहकर्मचारी असो कोणीही असो! आपल्याला नेहमी ह्या अशा वाक्यांना सामोरं जावं लागतं.”
बॉडी शेमिंगला तोंड देणाऱ्या भक्कम आधार देत केतकी म्हणाली की, “मी एवढं म्हणेन, यात मी तुमच्या बरोबर आहे. पण तुम्ही तुमच्या शरीराचा अभिमान बाळगा. तुम्ही खूप सुंदर आणि अद्वितीय आहात. देवाने दिलेल्या या वेगळेपणाला महत्त्व द्या जर एखादा डॉक्टर, आहारतज्ज्ञ, पालक किंवा तुमचे मित्र ज्यांना तुमची मनापासून काळजी असेल, तर तुम्हाला ते जे काही सांगत असतात, त्यांचं ऐका. अशी व्यक्ती नाही जी तुम्हाला खाली खेचून इच्छिते किंवा तुमचं वाईट विचार करते.
हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या मातीतल्या या एकमेव मराठी सिनेमाचा सिंगापूरमध्ये होणार प्रीमियर…
तसेच ट्रोलर्सना उत्तर देत केतकी म्हणाली की, “प्रिय ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, SKINNY, (हाडांचा सापळा) बारिक आहे. हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील माझे आजोबा सगळे बारीक तशी मी सुद्धा आहे बारीक! तरीही अजिबात ना थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं. थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल! पण म्हणून unhealthy आहे का? तर अजिबात नाही! व्यायाम किंवा जिम हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीके. पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्टवर ओपनली कमेंट करणं. ह्याला तुम्ही ‘स्वातंत्र्य’ आणि ‘फ्री स्पीच’ असं नाव देता.”
“आम्ही ट्रोलिंगपासून मुक्त झालो असलो तरी, जे आम्हाला पाठिंबा देतात आणि प्रेरित करतात अशा १०० आणि १००० सुंदर लोकांच्या तुलनेत तुमची संख्या फार कमी आहे. आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत. आम्हालाही दुखापत होते. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. याचा विचार करा. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. ह्याचा विचार करा. आणि काही लोकं असे ही असतील ज्यांना खरंच मेडिकल प्रोब्लेम असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल, कल्पना करा की, तुम्ही त्यांना कोणत्या भयंकर मानसिक अवस्थेमध्ये टाकत आहात. थोडे दयाळू आणि प्रेमळ व्हा. थोडी सहानुभूती बाळगा.”
तर तिला कायम आधार देणाऱ्या आणि कायम तिच्या पाठीशी असणाऱ्या चाहत्यांसाठी केतकीने लिहिले की, “तुमच्या सतत प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि निष्ठेसाठी खूप खूप धन्यवाद. मी जशी आहे तशीच मला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला समजून घेता. तुमचे सकारात्मक संदेश, मला प्रेरित करतात. सर्वात महत्त्वाच म्हणजे जेव्हा असं काही घडतं तेव्हा तुम्ही पहिले असतात, जे मला तुमच्या प्रतिक्रियेतून आणि पोस्टमधून हसवतात. मी तुमचे डीएमस आणि मेसेजच्या कमेंट वाचते. तुम्ही दिलेला पाठिंबा पाहून मी खूप भारावून गेले आहे. मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगल होत जाण्याचा प्रयत्न करतेय! आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन! खूप सारं प्रेम, केतकी”
केतकीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला पाठींबा दिला आहे.