कुणी म्हणतं मराठमोळा कलाकार, कुणी म्हणतं शिवाजी गायकवाड, तर चाहत्यांसाठी लाडका थलायवा असे नावाजलेले दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणजेच अभिनेते रजनीकांत. आज रजनीकांत यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यांची जादू तसूभरही कमी झालेली नाही. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी कर्नाटकच्या बेंगळूर मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे.
जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना मोठे यश मिळाले आहे, परंतु रजनीकांत यांनी ज्या प्रकारे संघर्षमय परिस्थितीत इतिहास घडविला ते फार कामी लोकांना जमलं आहे. रजनीकांत यांचं आयुष्यचं नाही, तर चित्रपट सृष्टीचा प्रवासही अनेक चढउतरांनी भरला आहे. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी रजनीकांत यांनी हमाली, आणि बस कंडक्टरचं काम केलं होतं. कंडक्टर म्हणून काम करताना त्यांना महिना ७५० रुपये मिळायचे. कंडक्टर रजनीकांत यांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीच्या काळात चांगली नव्हती. मात्र त्यांनी एका मित्राच्या मदतीने अॅक्टिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला.
View this post on Instagram
असं म्हटलं जातं की, बसमध्ये अनोख्या पद्धतीने तिकीट देण्याच्या त्यांच्या सवयीकडे एका दिग्दर्शकाची नजर पडली. तिथेच त्यांनी रजनीकांत यांना सिनेमात काम देण्याचा निर्णय घेतला. काही चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका केल्यानंतर १९७६ मध्ये ‘मुंदरु मुदिचू’ या सिनेमात रजनीकांत यांना मोठा रोल मिळाला. त्या सिनेमातही कमल हासन होते. कमल हासन यांना ३० हजार रुपये मानधन मिळालं होतं. तर रजनीकांत यांना दोन हजार रुपये. या सिनेमातली रजनीकांत यांची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल लोकांना खूपच आवडली आणि लोक ही स्टाईल कॉपीही करु लागले. स्टाईलच्या बाबतीत तर ते नेहमीच सर्वांपेक्षा फारच वेगळे होते. ते कोणत्याही प्रकारची भूमिका खूपच सुंदररित्या सादर करतात. आतापर्यंत त्यांनी विनोदी, मोहक, हिंसक यांसारख्या अनेक भूमिका अगदी उत्तमप्रकारे पार पाडल्या आहेत.
१९७७ मध्ये आलेला ‘चिलाकम्मा चेप्पिंदी’ हा सिनेमा रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. १९७८ मध्ये आलेला बैरवी आणि त्यानंतर १९८० मध्ये आलेला बिल्ला यामुळे रजनीकांत सुपरस्टार झाले.
करिअरच्या सुरुवातीच्या १० वर्षांमध्येच १०० सिनेमांमध्ये काम केलं. हा रेकॉर्डही त्यांच्याच नावावर आहे. त्यांना मिळणारं यश हे असंच उदंड राहो याच शुभेच्छा!