मराठी सिनेसृष्टीला अनेक नामवंत कलाकार लाभले. कलाकारांनी प्रेक्षकांसमोर अगदी उत्तम कला सादर करून त्यांचे मनोरंजन केले. त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे.
२०११ मध्ये रवींद्र यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले. उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी देखील सोडले. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही काळापासून ते आजाराशी लढत होते, मात्र आज त्यांच्या या लढ्याला अपयश आले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
रवींद्र बेर्डे यांनी मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. वयाच्या विसाव्या वर्षापासून नभोवणाशी त्यांची नाळ जोडली गेली. नभोवणीत त्यांनी २४ वर्ष सेवा केली होती, त्यानंतर १९८७ साली त्यांना नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. नाटकातून काम करत असताना रविंद्र बेर्डे यांना विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ३१ नाटकात काम केले होते. यातूनच पुढे ते सिनेमातून देखील महत्त्वाच्या भूमिका साकारू लागले. रवींद्र बेर्डे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली.
रवींद्र बेर्डे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाईचा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते. तर हिंदीत सिंघम सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. ३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास ५ हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले होते.
रवींद्र बेर्डे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.