मराठी सिनेसृष्टी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात मोलाचा वाटा असणारे मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते म्हणजे ‘भरत जाधव.’ अभिनेते भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ साली झाला. म्हणजेच आज भरत जाधव यांचा वाढदिवस. चला तर मग आज आपण जाणून घेऊया भरत जाधव यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
लालबाग परळमधील राजाराम स्टुडिओच्या चाळीत भरत यांचे बालपण गेले. ते राहत असलेली चाळ निर्माते, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या मालकीची होती. भरत यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला अनेक छोटी-मोठी कामे केली. १९८५ मध्ये शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’पासून भरत यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द सुरु झाली. यानंतर त्यांची ‘आॅल द बेस्ट’ ही एकांकिका प्रचंड गाजली आणि यावर आधारित अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासह सादर केलेले आॅल द बेस्ट हे नाटकही प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले.
View this post on Instagram
त्याचप्रमाणे आमच्यासारखे आम्हीच, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, पुन्हा सही रे सही, तू तू मी मी आणि नुकतेच प्रदर्शित झालेले अस्तित्व ही नाटके त्यांची चांगलीच गाजली. त्यामुळे मराठी रंगभूमीवर त्यांच्या अभिनय कौशल्याने त्यांचे चांगलेच नावलौकिक झाले. नाटकासंबंधित आणखी एक खास गोष्ट म्हणजे, सही रे सही या नाटकात भरत यांनी गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा आणि वेडसर मुलगा अशा चार प्रकारच्या वेगळ्या भूमिका त्यांनी एका नाटकात साकारल्या होत्या. हे नाटक इतके गाजले की, या नाटकाचे एका वर्षात तब्बल ५६५ प्रयोग झाले आणि याची नोंद थेट गिनीज बुकमध्ये झाली.
विनोदवीर भरत यांनी खतरनाक, बाप रे बाप, खबरदार, पछाडलेला, सरीवर सरी, जत्रा, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, गलगले निघाले, गोंद्या मारतंय तंगडी, साडे माडे तीन, शिक्षणाच्या आयचा घो, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा यांसाख्या अनेक मराठी सिनेमातून भरत यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तसेच एक उत्कृष्ट विनोदी नट म्हणून त्यांना ओळखले जाते. विनोदवीर भरत यांनी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत जवळपास ९८ सिनेमे केले आहेत. तसेच त्यांनी ८ मालिकांमध्ये देखील काम केले आणि रंगभूमीवर ८५०० पेक्षा जास्त प्रयोग त्यांनी केले आहेत.
भरत जाधव यांनी २०१३ मध्ये ‘भरत जाधव एन्टरटेन्मेंट’ची स्थापना करत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. नाटक, मालिका आणि सिनेमातील अग्रणी अभिनेते आता निर्माते म्हणून मनोरंजनसृष्टीत कार्यरत झाले. सिनेसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे भरत यांचे परममित्र. भरत जाधव यांच्या पत्नीचे नाव सरिता जाधव असून भरत आणि सरिता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव सुरभी तर मुलाचे नाव आरंभ असे आहे.
मराठी सिनेसृष्टीतील हुरहुन्नरी अभिनेते भरत जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.