अभिनेता प्रसाद ओक चा ४८ वा वाढदिवस
अभिनेता प्रसाद ओक आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रसाद हा एक उत्तम अभिनेता तर आहेच त्याचप्रमाणे, तो एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे.
प्रसादच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये त्याची बायको मंजिरी हिचा मोठा वाटा आहे. प्रसाद आणि मंजिरी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहेत.
प्रसाद ओक च्या वाढदिवसानिमित आपण जाणून घेऊया प्रसाद आणि मंजिरीची लव्हस्टोरी
प्रसाद पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) मध्ये शिकत होता. प्रसाद कॉलेजमध्ये शिकत असताना अभिनयाचं वर्कशॉप घ्यायचा. या वर्कशॉपमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मंजिरी सुद्धा त्या काळात अभिनय करायची. काहीतरी शिकायला मिळेल, आणि पुढे एकांकिकेत काम मिळेल या भावनेने मंजिरीने सुद्धा प्रसादच्या वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता.
प्रसादने त्याच्या वर्कशॉपमध्ये पाच एकांकिका बसवल्या
प्रसादने त्याच्या वर्कशॉपमध्ये पाच एकांकिका बसवल्या, त्यात त्याने त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अभिनय करण्याची संधी दिली. मात्र त्याने मंजिरीला काही यात संधी दिली नाही. मंजिरीला नाटकात भूमिका साकारायची होती. पण प्रसादने मात्र अजूनही तिला संधी दिली नव्हती. आणि अशातच प्रसादला एका दिवाळी अंकात क्रॉस कनेक्शन ही एकांकिका सापडली. क्रॉस कनेक्शन ही एकांकिका धम्माल कॉमेडी होती. त्यात नवरा बायकोची गोष्ट होती. बायकोच्या भूमिकेसाठी प्रसादने मंजिरीची निवड केली. पण नवऱ्याच्या भूमिकेत प्रसादला कोणीही अभिनेता सापडत नव्हता. मग प्रसादने स्वतःच नवऱ्याची भूमिका करायचं ठरवलं. रिहर्सल सुरु झाल्या.. नाटकानिमित्ताने भेटीगाठी वाढल्या.. आणि नाटकात नवरा बायको झालेले प्रसाद मंजिरी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांचे जोडीदार बनले.
‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ पासून प्रसाद ओक चांगलाच चर्चेत आला
‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ पासून प्रसाद चांगलाच चर्चेत आला आहे. २०२२ मध्ये धर्मवीर आला आणि तो सुपरहिट झाला, आता लवकरच ‘धर्मवीर २’ येणार आहे. यामध्ये प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. धर्मवीर सिनेमात प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेमुळे त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली आणि त्याचबरोबर त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले.