सध्या मनोरंजनविश्वातून रसिक प्रेक्षकांसाठी नवनवीन सिनेमांची पर्वणी मिळत आहे. त्यामुळे सिनेमाकडे प्रेक्षकांचा कल दिवसेंदिवस आणखीनच वाढत आहे. तर सध्या ‘बॉईज ४’ या मराठी सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शित केलेला बॉईज ४ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यापूर्वी २०१७ साली बॉईज सिनेमाचा पहिला भाग तर २०१८ साली सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मागील वर्षी बॉईजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे पुन्हा एकदा या सिनेमाचा पुढील चौथा भाग ही प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बॉईज ४ मध्ये हास्यसम्राट दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता ‘अभिनय बेर्डे’ महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर त्याशिवाय अनेक नवोदित कलाकारही या सिनेमात झळकले आहेत. त्यामुळे या सिनेमाची रंजकता आणखीनच वाढली आहे. आपले काम पाहून आपल्या कामाची खरी पोचपावती मिळते ती आपल्या आई-वडिलांकडूनच. या सिनेमातील मुलाच्या कामाबद्दल अभिनयची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ‘प्रिया बेर्डे’ यांनी नुकतेच आपले मत मांडले आहे.
अभिनयचा बॉईज ४ हा सिनेमा पाहिल्यावर सिनेमाबद्दल आणि अभिनयच्या कामाबद्दल बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या की, “बॉईज ४ हा खूपच धमाल आणि टाइमपास चित्रपट आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना अनेक गोष्टींची जाणीव होईल. कारण, मनोरंजन आणि विनोदाबरोबरच यातून खूप चांगले चिमटे काढण्यात आले आहेत. माझा लेक अभिनयबद्दल सांगायचं झालं, तर त्याचा एक नवीन आणि हटके लूक या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्याची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं मला वाटतं. अवधूत गुप्तेंची गाणी उत्तमचं आहेत. एकंदर हा चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो.”
प्रिया बेर्डे यांची ही प्रतिक्रिया पाहून अनेक प्रेक्षक देखील हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक होऊन सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहे.