मराठी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. सयाजी शिंदे यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केले.
मराठी सिनेसृष्टी तर गाजवलीच शिवाय हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला. तसेच मराठी-हिंदीसह त्यांनी कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू या सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. आणि आता नुकतीच चाहत्यांना त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल समजले. त्यामुळे त्यांचे चाहते आता काळजीत पडले आहेत.
काही दिवसांपासून त्यांना हृदयाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे ११ एप्रिल २०२४ सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली. तर त्यांच्या प्रकृतीबद्दल स्वतः त्यांच्या डॉक्टरांनी माहिती दिली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, “सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं.”
तसेच पुढे ते म्हणाले की, “स्ट्रेस टेस्टही त्यांची करण्यात आली होती. यातही मायनर दोष सापडले. अँजिओग्राफी करण्याचा आम्ही त्यांना सल्ला दिला होता. पण दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झालं आणि ते साताऱ्यात आले आणि त्यांनी अँजिओग्राफी करण्याचं ठरवलं. हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये एक ९९ टक्याच्या ब्लॉक आढळला. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सर्व गोष्टी पाहिल्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल.”
तर सयाजी शिंदे यांच्या रुटीनबद्दल देखील त्यांनी सांगितले. तेव्हा ते म्हणाले की, “शूटिंगसह सामाजिक उपक्रमांमुळे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यात उत्साह असतो. कामात ते स्वत:ला झोकून देतात. पण झोकून देतानाही शरीरातील बदल त्यांनी ओळखले आणि योग्यवेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते आता पुन्हा चांगलं काम करू शकतील.”
त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.