‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. या रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या अंतिम सोहळ्यात समर्पण लामा, अनिकेत चौहान, अंजली ममगाई, विपुल खांडपाल आणि शिवांशू सोनी या ‘टॉप ५’ स्पर्धकांचा समावेश असून पुण्याच्या ‘समर्पण लामा’ने इंडियाज बेस्ट डान्सर ३ च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
समर्पण लामा याने ट्रॉफी जिंकल्यामुळे पुण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. समर्पण लामा याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याच्या उत्कृष्ट नृत्याने आणि क्यूटनेसने त्याने केवळ परीक्षकांचेच नव्हे तर देशभरातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे सध्या प्रेक्षकांकडून त्याचे भरभरून कौतुक होत आहे.
View this post on Instagram
पुण्याच्या समर्पण लामाने विजेतेपद जिंकलं तर अंजली ममगाई फर्स्ट रनर अप, शिवांशू सोनी सेकंड रनरअप, अनिकेत चौहान चौथा तर विपुल खंडपाल पाचवा विजेता ठरला. त्यामुळे सर्वजन त्यांच्या कष्टाचे आणि चिकाटीचे कौतुक करताना दिसत आहेत.
समर्पणने अंतिम फेरीत दोन डान्स सादर केले. त्याच्या पहिल्या डान्समध्ये त्याने कथ्थक आणि हिप-हॉप शैलीचे मिश्रण सादर केले. तर दुसऱ्या डान्समध्ये त्याने कथ्थक शैलीतील एक क्लासिक डान्स सादर केला. समर्पणने या शोमध्ये विविध प्रकारचे डान्स सादर केले. त्याच्या डान्ससाठी त्याला प्रेक्षकांकडून भरभरून कौतुकही मिळाले. तसेच समर्पणने ट्रॉफी सोबतच १५ लाखाचे बक्षीस देखील पटकावले आहे. त्याच्या कोरिओग्राफरला म्हणजेच भावना खंडूजाला देखील ५ लाखांचे बक्षीस मिळाले.
ट्रॉफी जिंकल्या नंतर समर्पण म्हणाला की, “माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे. अनिकेत चौहाननंतर जेव्हा माझी टॉप १३ स्पर्धकांमध्ये निवड झाली, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खरा विजय होता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “या शोमध्ये मी इतक्या पुढे जाईल याची कल्पना मी कधीच केली नव्हती. या स्पर्धेदरम्यान मला पराभव आणि विजय दोन्ही मिळाले. तुमचा पराभव होणे तितकंच महत्वाचं असतं कारण ते तुम्हाला खूप काही शिकवतात.” असे म्हणत समर्पणने सर्वांचे आभार मानले.