जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’. जगभरातील चित्रपटप्रेमी या पुरस्कार सोहळ्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. सिनेसृष्टीसोबत जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती मग तो कलाकार, दिग्दर्शक, गायक असुदेत किंवा आणखी कोण असुदेत, आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार मिळावा हे स्वप्न उराशी बाळगून प्रत्येकजण अपार कष्ट करत असतात. ११ मार्च रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटरमध्ये पार ऑस्कर सोहळा पडला. भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजता या पुरस्कार सोहळ्याची सुरवात झाली होती. यावर्षी देखील या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा ‘जिमी किमेल’ याने सांभाळली. त्याची सूत्रसंचालनाची धुरा सांभाळण्याची ही चौथी वेळ होती. यंदाचं हे पुरस्कार सोहळ्याचे ९६ वे वर्ष होते. मागील वर्षी भारताने या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली होती.
यंदाच्या वर्षी ‘ओपनहायमर’ या सिनेमाने बाजी मारली. त्यांना पुरस्कार सोहळ्यात एकून १३ नामांकने मिळाली होती. त्यापैकी ७ पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर, सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असे ७ पुरस्कार या सिनेमाने पटकावले आहेत.
तर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार अभिनेत्री ‘एमा स्टोन’ला ‘पूअर थिंग्स’या सिनेमातील तिच्या उत्तम अभिनयासाठी मिळाला आहे.
तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘सिलीयन मर्फी’ या अभिनेत्याला ‘ओपनहायमर’या सिनेमासाठी मिळाला.
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार ‘बिली इलिस’ हिला बार्बी या सिनेमातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्यासाठी मिळाला.
‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ हा पुरस्कार युनायटेड किंग्डम मधील ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ या सिनेमाने पटकावला.
‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर फिल्म’हा पुरस्कार ‘२० डेज इन मारीयुपोल’ या सिनेमाने जिंकला.
‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शोर्टफिल्म’ हा पुरस्कार ‘द लास्ट रिपेअर शॉप’ या सिनेमाला मिळाला.
या पुरस्कार सोहळ्यात आणखी एका सिनेमाने इतिहास रचला आहे. तो सिनेमा म्हणजे ‘गॉडझिला मायनस वन’. या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स’ हा पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाने हॉलिवूडच्या चार बिग बजेट सिनेमांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ‘सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स’ या श्रेणीत अनेक दशकानंतर अमेरिकन स्टुडियोला मागे टाकत बाहेरच्या व्हिज्युअल स्टुडियोला हा पुरस्कार मिळाला आहे. गेले अनेक दशकं हा पुरस्कार अमेरिकन स्टुडियोला मिळत आहे. ‘गॉडझिला मायनस वन’ हा सिनेमा एका जपानी व्हिज्युअल स्टुडियोमध्ये तयार झालेला सिनेमा आहे. गॉडझिला फ्रँचायझीकडून चित्रपटाला ७० वर्षातून पहिल्यांदाच नामांकन मिळाले होते आणि पहिल्यांदाच या चित्रपटाने पुरस्कार जिंकला.