बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे ‘मिथुन चक्रवर्ती’. मिथुन यांना संपूर्ण देशभरात ‘डिस्को डान्सर‘ म्हणून आजही ओळखले जाते.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा आज ७३ वा वाढदिवस. डिस्को डान्सर, मर्द, कमांडो, शपथ, वीर, गोलमाल ३ हे मिथुन यांचे गाजलेले सिनेमे. ते आज जरी संपूर्ण जगासमोर एक सुपरस्टार असतील तरी त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड हालअपेष्टा सोसल्या. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले आहेत.
कामाचे क्षेत्र जेवढं अवघड होते, त्याचप्रमाणे त्यांचे खासगी म्हणजेच वैवाहिक आयुष्यही फार गुंतागुंतीचे होते. त्यातही त्यांना फारसे सुख मिळाले नाही. कारण त्यांनी आत्तापर्यंत तब्बल तीन लग्न केल्याचे समोर आले आहे.
मिथुन यांचे पहिले लग्न ‘हेलेना ल्युक’ या अभिनेत्री सोबत झाले होते. हेलेना या ७०च्या दशकातील फॅशन आयकॉन म्हणून देशभरात प्रसिद्ध होत्या. त्यांच्यात सर्व काही सुरळीत चालू होते. परंतू मिथुन आणि हेलेना यांच्या वादाचे कारण ठरला तो मिथुनचा चुलत भाऊ. त्यावेळी मिथुनचा चुलत भाऊ त्यांच्या सोबत राहत होता. याचा परिणाम असा की मिथुन आणि हेलेना लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच वेगळे झाले.
त्यांनतर मिथुन चक्रवर्ती यांनी ‘योगिता बाली’ यांच्यासोबत नवा संसार थाटला. योगिता बाली या किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नी. मिथुन आणि बाली यांच्यातील प्रेमसंबंध किशोर कुमार यांना समजताच किशोर कुमार आणि बाली वेगळे झाले. त्यांनतर मिथुन आणि बाली सुखाचा संसार करू लागले.
याचदरम्यान मिथुन हे देखील उत्कृष्ट अभिनेता म्हणून नावारूपास येत होते. पण वैवाहिक जीवनात पुन्हा वाद सुरू झाले आणि वारंवार खटके उडू लागले. यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला तो श्रीदेवी यांच्यामुळे. भरभराटीच्या काळात ते दोघेही अनेकदा सोबत असायचे तेव्हा फक्त मिथुनच नाही तर श्रीदेवी देखील मिथुन यांच्या प्रेमात पडल्या होत्या. तेव्हा सिनेसृष्टीत त्यांच्या नात्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
त्यावेळी अनेकांनी असेही वक्तव्य केले की श्रीदेवी आणि मिथुन यांनी गुपचूप लग्न केले आहे. काही काळानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी ते मान्यही केले. हा सर्व प्रकार जेव्हा मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली यांना समजले तेव्हा त्यांनी दोघांना समज देऊन हे प्रकरण मिटवले होते. परंतू या सर्व गोष्टींमध्ये मिथुन यांनी श्रीदेवी यांना कधीच पत्नीचा दर्जा देऊ शकले नाही.