छोट्या पडद्यावर वारंवार नवनवीन मालिका आणि वेगवेगळ्या कथा घेऊन अनेक कार्यक्रम प्रदर्शित होत असतात. त्यापैकी काही कार्यक्रम प्रेक्षकांना वेड लावतात.
महाराष्ट्राला आपल्या आवाजाने वेड लावणारा सुप्रसिध्द गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांचा नवीन शो लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. अवधूत गुप्ते यांचा हा शो म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते.’ हा शो नवीन नाही, तर हा शो काही वर्षानंतर पुन्हा एकदा दिसणार आहे.
खुपते तिथे गुप्ते हा अवधूत यांचा टॉक शो तब्बल १० वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यापूर्वी या शोचे दोन पर्व झाले आहेत. ते दोन्ही पर्व प्रचंड गाजले. त्यामुळे हा शो देखील अगदी सहजच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. असे असले तरी त्यानंतर हा शो बंद करण्यात आला.
झी मराठी वाहिनीने नुकतच या शोचा प्रोमो प्रदर्शित केला. अन् प्रेक्षकांना चकटन जुन्या पर्वाची आठवण झाली. इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर हा शो आला आहे म्हंटल्यावर हे पर्व नक्कीच आधीपेक्षा वेगळे आणि आणखीनच रंजक असणार आहे. यावेळी अवधूत गुप्ते न बोलल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी समोर आणून नवनवीन अन् बहुधा धक्कादायक गुपिते उलगडणार आहेत.
या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते हे स्वतः झळकले असून ते म्हणतात की, “ही खुर्ची देशाचं भविष्य घडवते, ही निर्दोषांना न्याय मिळवून देते, ही माणसाचा जीव वाचवते आणि ही खुर्ची प्रश्न विचारते. हिच्या प्रश्नांनाही खूप धार आहे, या खुर्चीवर बसायला कोण-कोण तयार आहे. आता खुपणार नाही तर टोचणार.”
तर प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे या पर्वामध्ये प्रमुख आकर्षण ठरली आहे खुर्ची. ही खुर्ची खूपच छान पद्धतीने तयार करण्यात आली आहे. ही खुर्ची मिळविण्यासाठी कलाकार, राजकारणी आणि आणखी कोणामध्ये चढाओढ होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. खुपते तिथे गुप्ते हा शो येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.