टेलिव्हिजन विश्वातील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचे आहेत. आतापर्यंत अनेक कलाकार मालिका सोडून निघून गेले, त्यांच्या जागी नवीन कलाकार देखील आले. पण जी पसंती जुन्या कलाकारांना मिळायची, ती नवीन कलाकारांना मिळत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका चर्चेचा विषय बनली आहे. त्याला अनेक कारण होती. पण आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. त्याच कारण म्हणजे या मालिकेत सोढी हे लोकप्रिय पात्र साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. तो दिल्ली वरून मुंबईला येण्यासाठी घरातून तर निघाला, मात्र तो मुंबईमध्ये पोहोचलाच नाही. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदिवली आहे.
तर आता या संदर्भात आणखीन एक गोष्ट समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते जेडी मजेठीया यांना गुरुचरणने शेवटचा मॅसेज केला होता. याची माहिती स्वतः जेडी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मी एका मीटिंगमध्ये असताना गुरुचरण व माझी मैत्रीण भक्ती सोनीने मला फोन केला. तिने गुरुचरण २२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं. तो त्यादिवशी मुंबईला येणार होता, त्यासाठी तो घरातून निघाला, पण मुंबईला आला नाही. भक्ती त्याला आणायला मुंबई विमानतळावरही गेली होती, पण तो सापडला नाही. मग तिने एअरपोर्ट अथॉरिटीला विचारपूस केल्यावर कळालं की तो दिल्लीतून विमानात बसलाच नाही. पण विमानात बसण्याआधी बोर्डिंग प्रोसेस करत असल्याचा मेसेज त्याने भक्तीला पाठवला होता. गुरुचरणचे वडील त्याला शोधत होते, नंतर त्यांनी तो बेपत्ता असल्याची जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचे आई-वडील खूप वृद्ध आहेत आणि त्यांची प्रकृती बरी नसते. मला भक्तीने गुरुचरणबद्दल सांगितल्यावर मी मेसेज करून सर्वांना त्याच्याबद्दल सांगितलं. मी तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशींनाही फोन करून कळवलं आहे.”
पुढे जेडी यांना गुरुचरण सिंग यांचा मानसिक स्तिथीबद्दल देखील विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले की, “तो अगदी ठणठणीत आहे. मी दिलीप जोशींशी बोललो. तेव्हा त्यांनीही सांगितलं की तो खूप चांगला आहे. गुरुचरण बेपत्ता आहे हे जास्तीत जास्त लोकांना कळावं आणि त्याने सुखरुप घरी परतावं इतकीच माझी इच्छा आहे.”
त्यामुळे गुरुचरण कुठे आहे? कसा आहे? याची अद्याप खबर मिळालेली नाही.