स्वप्नांचं शहर अशी ओळख असणारी मायानगरी म्हणजे आपली मुंबई. इथं अनेक तरुण स्वप्न घेऊन येतात आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात. काहीजण आपल्याला चांगली नोकरी लागेल, आपण सेटल होऊ या आशेने मुंबईला येतात. तर, काहीजण आपण मुंबईत येऊन बिझनेस सुरु करू किंवा स्वतःचं विश्व निर्माण करू यासाठी मुंबईची वाट धरतात.
मात्र, या सगळ्यात आणखी एक मोठा वर्ग आहे तो म्हणजे मुंबईत येऊन चित्रपटात काम करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांचा. अनेक तरुण मुंबईत येऊन आपल्याला सिनेमात काम मिळेल, आपण देखील मोठे कलाकार होऊ असे स्वप्न घेऊन मुंबईला येतात. आज सिनेसृष्टीत नामांकित असलेले असे अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी अशी स्वप्नं पाहिली आणि आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या तरुणांच्या स्वप्नांचा इतिहास मुंबईतल्या एका सिनेमागृहानं खूप जवळून पाहिलाय तो सिनेमागृह म्हणजे चर्चगेट येथील ‘इरॉस’ सिनेमागृह.
मुंबईसोबतच भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास तब्बल ८९ वर्षे आपल्या उराशी बाळगणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह आता तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा सिनेप्रेमींच्या सेवेत दाखल झाले आहे. या सिनेमागृहाचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे. २०१७ साली प्रदर्शित झालेला ‘बाहुबली 2’ हा या सिनेमागृहात दाखवण्यात आलेला शेवटचा सिनेमा. त्यानंतर सिनेमाची वास्तू जुनी झाल्याने आणि त्याच्या नूतनीकरणासाठी ते बंद करण्यात आले होते. पण आता सात वर्षांनी या सिनेमागृहाचं काम पूर्ण झालं असून, आता पुन्हा एकदा मुंबईकरांना या सिनेमागृहाचा लाभ घेता येणार आहे.
सन १९३५ मध्ये पारशी व्यापारी शियावक्स कावसजी कंबाटा यांनी एक सिनेमागृह निर्माण करण्याचं ठरवलं. आता हे काम कुणाला द्यायचं? असा प्रश्न होता. तर त्यांनी हे काम वास्तूविशारद सोहराबजी भेदवार यांना द्यायचं ठरवलं. या सिनेमागृहाचं ‘इरॉस’ हे नाव ग्रीक देवतेच्या नावावरून ठेवण्यात आलं. वास्तूविशारद सोहराबजी भेदवार यांनी स्वतः डिझाईन केलेलं हे सिनेमागृह ग्रीक शैलीवर आधारित आहे. शियावक्स कावसजी कंबाटा यांनी १९३५ मध्ये पाहिलेलं स्वप्न १९३८ साली पूर्ण झालं आणि अखेर १० फेब्रुवारी १९३८ रोजी हा सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुला करण्यात आला.
चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या अगदी पलिकडे व्ही-आकाराच्या कंबाटा इमारतीत असलेलं इरॉस या वास्तूच्या भिंती मजबूत होत्या, पण छताचं नुकसान झालं होते. इमारत जुनी असल्याने त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होतं. अखेर २०१९ ला दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अखेर २०२४ मध्ये दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन ९ फेब्रुवारी २०२४ रोजी या सिनेमागृहात सिनेमे दाखवायला सुरुवात झाली. तर शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन या बॉलिवूड कलाकारांचा ‘तेरी बातोमें ऐसा उलझा जिया’ हा सिनेमा सध्या या सिनेमागृहाच्या पडद्यावर झळकत आहे.