सध्या मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता १९ व्या शतकात समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि समाजाचा संघर्ष, विरोध पत्करून समाजातील प्रत्येकाच्या मनात शिक्षणाचा पाया रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पहिल्या महिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी या जयंतीदिनाचे औचित्य साधून ५ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी साकारली असून राजश्री देशपांडे या सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. त्यामुळे रसिक प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तर या बहुचर्चित सिनेमानंतर आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर इंग्रजी नाटक देखील आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनानिमित्त या नाटकाची घोषणा झाली आहे. प्रसिद्ध लेखिका सुषमा देशपांडे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत ‘व्हय मी सावित्रीबाई’ या इंग्रजी नाटकाची घोषणा केली. तर या नाटकाची घोषणा करताना त्यांनी खूपच खास फोटो शेअर केले. या फोटोमधून सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत कोण दिसणार हेही स्पष्टपणे सांगितले आहे. तर व्हय मी सावित्रीबाई या इंग्रजी नाटकात सावित्रीबाईंची प्रमुख भूमिका अभिनेत्री ‘नंदिता पाटकर’ साकारणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत नंदिता सरू वहिनीच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेतून नंदिता रसिक प्रेक्षकांच्या घरांघरात पोहोचली. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमुळे नंदिताच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. त्यानंतर आता ती मालिकेतून नाही तर रंगमंचावरून, तेही इंग्रजी नाटकातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लेखिका सुषमा देशपांडे यांनी नंदिताचा आणि तिच्यासोबतच फोटो शेअर करत लिहिले की, “मराठी रंगभूमी दिनानिमित्त जाहीर करायला आनंद होत आहे. लवकरच मराठमोळ सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांवरचे नाटक ‘व्हय मी सावित्रीबाई!’ English मध्ये येत आहे. आता सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे नंदिता पाटकर.”
त्यांच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे सारेजण या नाटकाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.