मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. अनेकजण त्यांच्या प्रेमाची आणि साथीदाराची घोषणा करत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘मुग्धा आणि प्रथमेश’ ने देखील त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. तेव्हापासून ते दोघे कधी लग्नगाठ बांधणार याकडेच चाहत्यांचे लक्ष वेधले होते.
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची पहिली भेट ‘सारेगमप लिटिल चाम्प्स’च्या मंचावर झाली. या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेश रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचले. आता त्या दोघांनीही संगीत क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका कार्यक्रमात प्रथमेशने त्याच्या मनातील भावना मुग्धाला सांगितली. काही दिवसांनी तिने प्रथमेशला होकार दिला. तर ही बातमी काहीच दिवसात त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि नंतर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली.
सारेगमप या मंचावर सुरू झालेल्या त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोन सुरवीरांनी एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार केला. तर आता कुटुंबाच्या साक्षीने त्या दोघांनीही त्यांच्या नात्याला एक खास वळण देण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्या अनेक ठिकाणच्या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते, तेव्हा तर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. परंतू त्या दोघांनीही ना त्यांच्या साखरपुड्याची ना त्यांच्या लग्नाची तारीख जाहीरपणे सांगितली.
मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाच्या चर्चा असतानाच अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले. ५ नोव्हेंबर रोजी मुग्धा व प्रथमेशचा अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने साखरपुडा पार पडला. त्यांनी अचानक दिलेल्या या बातमीमुळे चाहते मात्र अवाक् झाले. मुग्धा आणि प्रथमेशने जरी गुपचूप साखरपुडा उरकला असला तरी त्यांच्या चाहत्यांना या बातमीने आनंद झाला हे निश्चित. मुग्धा आणि प्रथमेशने यांनी साखरपुड्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करत लिहिले की, “वाङ्निश्चय…” शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दोघेही अगदी मराठमोळ्या लूकमध्ये दिसून येत आहेत.
View this post on Instagram
त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करत त्यांच्या चाहत्यांनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीनी देखील कमेंट्स करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. तर आता मुग्धा आणि प्रथमेश कधी लग्नबंधनात अडकणार याची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत.