अचूक टायमिंग आणि जबरदस्त विनोदी अभिनयाने खूपच कमी कालावधीत रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे ‘योगेश शिरसाट’ (Yogesh Shirsat). आज वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूया योगेशच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीवर.
रंगभूमीवरून सिनेसृष्टीत पदार्पण करून अवघ्या काहीच दिवसांत संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा कलाकार. योगेश अभिनयावर तर वर्चस्व गाजवतोच आहे, तर त्याशिवाय लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा देखील तो उत्तमपणे सांभाळत आला आहे. मस्त चाललंय आमचं, दुनियादारी, थँक यू विठ्ठला, ट्रिपल सीट, लई भारी, धर्मवीर यांसारख्या अनेक मराठी सिनेमांतून योगेशने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे.
योगेशच्या या दमदार सिनेमांपैकी त्याचा ‘दुनियादारी’ हा सिनेमा प्रचंड गाजला. खरं तर त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील हा सिनेमा टर्निंग पाॅइंट ठरला. मुंबईत आल्यावर करिअरच्या सुरुवातीला त्याने काम केलेल्या ‘काॅमेडीची बुलेट ट्रेन’ या विनोदी शोमधून योगेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला. तर याच शोमधून त्याने त्याच्या करिअरमध्ये स्थिरस्थावर व्हायला सुरुवात केली. या विनोदी शोशिवाय त्याने ‘फू बाई फू’ या शोसाठी संहिता लेखन केले आहे. तेव्हापासूनच ज्ञात झाले की अभिनयाव्यतिरिक्त योगेश लेखन, दिग्दर्शन आणि रंगभूषा यात देखील चांगलीच कामगिरी करतो.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी हालाखीच्या परिस्थितीत त्याने खूप काबाडकष्ट केले. घरी बेताची परिस्थिती असूनही त्याने नाटकात अनेक वर्षे काम करून रंगभूमीची सेवा केली. त्यात पण कधी त्याला पैशांच्या स्वरुपात मोबदला मिळाला तर ठीक नाहीतर मग, माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि नवी नाती जोडून पुढे निघायचा. तर आता सुरु असलेल्या चला हवा येऊ द्या या शोमधून देखील अनेकदा तो त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत असतो. योगेशला काम करून जोईटका आनंद मिळत असेल तितकाच आनंद त्याच्या चाहत्यांना त्याला काम करताना पाहून होतो हे नक्की.
अखेर योगेशने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज सिनेसृष्टीत आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात त्याचे हक्काचे आणि खंबीर स्थान निर्माण केले आहे. योगेशच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, योगेशच्या पत्नी सोनम शिरसाट आहे तर त्या दोघांना दोन मुले असून त्यांचे नाव साक्षात आणि प्रख्यात असे आहे.