पाताललोक २: काळानुसार अनेक गोष्टी बदलत असतात तसेच रसिक प्रेक्षकांच्या आवडी निवडी देखील बदलत असतात. त्याचप्रकारे सध्या भारतीय सिनेसृष्टीत नाटक आणि सिनेमांपेक्षाही वेबसिरीजला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
नवनवीन घटनांवर, कथांवर आणि समाजाला एक नवी दिशा देणारे नव्या धाटणीच्या वेबसिरीज तयार केल्या जातात. भारतात सध्या असंख्य लोक वेबसिरीजला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अनेक वेबसिरीज चांगल्याच लोकप्रिय होत आहेत. त्यापैकी एक वेबसिरीज म्हणजे ‘पाताललोक.’ ही वेबसिरीज २०२० साली प्रदर्शित झाली असून या सिरीजला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या भावासोबत म्हणजेच कर्णेश शर्मासोबत या वेबसिरीजची निर्मिती केली.
प्रेक्षकांच्या पसंतीस उरल्यामुळे या सिरीजचे चाहते पुढील पार्टसाठी प्रचंड उत्सुक होते. परंतू आता ३ वर्षे होत आली तरी या सिरीजच्या पुढील पार्टची कोणतीच बातमी समोर न आल्याने चाहत्यांनी पुढील पार्टची अपेक्षाच सोडून दिली होती. पण आता मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
हे देखील वाचा: वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया ‘आशुतोष राणा’ यांच्याबद्दल काही खास गोष्टी
पाताललोक या सिरीजचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी या सिरीज संबंधित नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. या सिरीजच्या पुढील भागाची, नवीन कथेची आणि यातील नव्या कलाकारांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अविनाश अरुण म्हणाले की, “पाताललोक २ चं सगळं चित्रीकरण व्यवस्थित पार पडले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ही सिरीज पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.” तसेच ते पुढे म्हणाले की, “ पाताललोक २ या सिरीजमध्ये प्रेक्षकांना खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पाताललोक पेक्षा पाताललोक २ ही सिरीज पूर्णपणे वेगळी असणार आहे.”
या मुलाखतीपासून प्रेक्षकांमध्ये सिरीजबद्दलची उत्सुकता चांगलीच ताणली आहे. परंतू आजूनही या सिरीजच्या पुढील भागात नक्की कोणते कलाकार झळकणार आहेत, हे मात्र आजूनही स्पष्ट झालेले नाही.