समसारा (द वाॅम्ब): मालिका आणि सिनेमांमधून आपल्या कर्तुत्वाने आणि कौशल्याने तमाम रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अनेक जोड्या, मालिका आणि सिनेमे तसेच नायिका व नायक आहेत. त्यापैकी दिसायला सुंदर, गोड, सोज्वळ आणि आपल्या अभिनयाने कायम चाहत्यांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे ‘सायली संजीव.’
अनेक मालिका आणि सिनेमांमधून आजवर सायलीने तिच्या चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान मिळवले आहे. छोट्या पडद्यावर काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली मराठीच नाही तर हिंदी भाषिक रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.
या मालिकेत सायलीने गौरी ही मुख्य भूमिका साकारली होती. तसेच तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेता ऋषी सक्सेना हा देखील शिव या मुख्य भूमिकेत होता. त्यावेळी गौरी आणि शिवची जोडी चांगलीच गाजली होती.
अनोखा विषय, वेगळी कथा तसेच त्यांच्या साथीला दमदार कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन अनेक वर्ष उलटली असली तरीसुद्धा ही मालिका आणि गौरी व शिवची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळावी ही इच्छा होती. पण ही जोडी पुन्हा कधी पाहायला मिळणार यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. परंतू आता मात्र त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेली सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी आता एका खास कारणासाठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
‘समसारा (द वाॅम्ब)‘ या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी आता छोट्या पडद्यावर नाही, तर रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या सिनेमाच्या नावाप्रमाणेच या सिनेमाची कथा देखील तितकीच अनोखी आहे.
गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असूर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशा जबरदस्त कलाकारांसोबत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समसारा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सागर लाढे सांभाळणार आहेत. नुकतंच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा पार पडला.
त्यामुळे समसारा हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.