प्रेमकहाणी कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते. मग ती आपली असो वा आपल्या लाडक्या कलाकारांची. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण अनेक कलाकारांच्या रोमँटिक पोस्ट बघितल्या. तर काहींची प्रेम कहाणी देखील जाणून घेलती.
सध्या कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप सहजतेने त्यांच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतात. त्यामुळे ते प्रेक्षकांना अधिकच जवळचे वाटू लागले आहेत.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. यादरम्यान त्याने आस्कएसआरके (asksrk) या सेशन अंतर्गत ट्विटरवरून त्याच्या असंख्य चाहत्यांसोबत संवाद साधला. या सेशन मध्ये त्याला विविध प्रकारची प्रश्ने चाहत्यांनी विचारली. त्यावर शाहरुखने अगदीच गमतीदार उत्तरे दिली.
तर आज याच सेशनमध्ये व्हॅलेंटाइन डेचं औचित्य साधत एकाने शाहरुखला प्रश्न विचारला की, “तू व्हॅलेंटाइन डे निमित्त गौरी मॅडमला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं?” त्यावर शाहरुखनेही अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिले की, माझ्या आठवणीनुसार मी कदाचित गुलाबी रंगाचे कानातले दिले होते आणि आता या गोष्टीला जवळपास ३४ वर्षे झाली आहेत.” यामुळे सर्वत्रच शाहरुखच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेच्या गिफ्टची चर्चा सुरू आहे.
शाहरुख आणि गौरी हे १९८४ मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. हळू हळू मैत्री, मग प्रेम आणि घरच्यांचा होकार मिळवत २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये त्या दोघांनी लग्न केले.