‘लुटेरे’मधून २०२४ ची बॉलिवूडमय सुरुवात करून अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) पुन्हा एकदा बॉलिवूड मधल्या काही खास कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. २०२४ मधला आमृताचा हा दुसरा बॉलिवूड प्रोजेक्ट असून ती आता अमेझॉन मिनी टीव्ही वरच्या ‘चाचा विधायक है हमारे 3’ मध्ये झळकणार आहे. लुटेरेमधली ‘अविका’ ते आता चाचा विधायक है हमारे 3 मधली ‘सुरेखा जी’ हा अमृताचा बॉलिवूड प्रवास अखंड सुरूच आहे.
अमृताने सोशल मीडियावरून ही खास बातमी तिच्या चाहत्यांना दिली असून ती या शोमध्ये कॉमेडियन झाकीर खान सोबत दिसणार आहे. अमृताने एक खास पोस्ट लिहिली आणि त्याला कॅप्शन देखील तितकच खास दिलं आहे.
View this post on Instagram
“मार्केटमध्ये विधायक जी यांना टक्कर देण्यासाठी कोणी तरी येतंय खबर पक्की आहे!” असं म्हणत अमृताने या शोवर शिक्कमोर्तब केला आहे. ‘चाचा विधायक है हमारे 3’ हा वेब शो नक्कीच भन्नाट असणार यात शंका नाही. या सगळ्याबद्दल बोलताना अमृता म्हणते “लुटेरेनंतर अजून एक बॉलिवूड प्रोजेक्ट करताना खूप आनंद होतोय. अमेझॉन सारख्या बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आमची वेब सीरिज येते याहून मोठी गोष्ट काय असणार! विधायक जी यांना टक्कर देणारी सुरेखा नक्की काय भूमिका बजावणार? याची मला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच प्रेक्षकांना सुद्धा याची उत्सुकता आहे. कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारत राहून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहण्यासाठी अजून काम करण्याची प्रेरणा यातून मिळते. चाचा विधायक है हमारे सीजन 3 मध्ये झाकीर खान सारखा दर्जेदार कॉमेडियन सोबत काम करण्याचा योगायोग या निमित्ताने जुळून आला आणि आता हा शो लवकरच सगळ्यांचा भेटीला येतोय म्हणून मी खूप उत्सुक आहे.”
आगामी काळात अमृता मराठीत देखील अफलातून प्रोजेक्ट्स घेऊन येणार असून ‘कलावती’, ‘ललिता बाबर’, ‘पठ्ठे बापूराव’ अश्या तिच्या उत्कंठावर्धक प्रोजेक्ट्ससाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळे २०२४ वर्ष अमृतासाठी दर्जेदार प्रोजेक्ट्सच ठरणार यात शंका नाही.