मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajkta Mali). आजवर प्राजक्ताने आपल्या अभिनयातून साऱ्यांचेच मन जिंकून घेतले.
अभिनय तर केलाच शिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून तिनं सुंदर सूत्रसंचालन करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिचं सूत्रसंचालन तमाम प्रेक्षकांना इतकं भावलं की, प्राजक्ता ऐवजी दुसरं कोणीही इतक्या वर्षात तिची जागा घेऊ शकले नाही. अगदी तिच्या अनुपस्थितीतही नाही. प्राजक्ताने अभिनय, सूत्रसंचालन या व्यतिरिक्तही कवियित्री, व्यावसायिका अशा वेगेवगळ्या क्षेत्रात नावलौकिक केले. त्यामुळे आता ती कोणत्या नव्या क्षेत्रात पाऊल टाकणार याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागली आहे.
प्राजक्ताने कालच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये प्राजक्ता तिच्या आईसोबत दिसत आहे. तर या फोटोमध्ये प्राजक्ता मोठ्या, लांबलचक कागदपत्रांवर सह्या करताना दिसत आहे. पण ही कागदं नक्की कोणत्या कामाची आहेत. याचा खुलासा केलेला नाही. पण तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी २३ एप्रिलला आयुष्यातील बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली. ही विवाह नोंदणी नाही, याची कृपया दखल घ्यावी.” तर तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्राजक्ता कशासाठी सह्या करतेय याचे फारच गमतीशीर अंदाज बांधले.
पण आज या सह्यांचं रहस्य उलगडलेलं आहे. प्राजक्ताने आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. तर तिच्या आजच्या या पोस्टमधून अनेक रहस्य उलगडले असले तरी त्यामुळे तिचे चाहते प्रचंड आनंदित झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे आज प्राजक्ताने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. तिच्या आगामी सिनेमाचे नाव ‘फुलवंती’ असे आहे. हा सिनेमा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे. पॅनोरमा स्टुडिओज आता सर्वात मोठी मराठी सिनेमाची निर्मिती ठरणार आहे.
एवढंच नाही तर हा सिनेमा प्राजक्तासाठी खूपच खास आहे. त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री म्हणून आपण आजवर जिला रुपेरी पडद्यावर पाहिले. ती आता पडद्यामागे राहून या सिनेमाची निर्मिती करणार आहे. अन् या सिनेमातून प्राजक्ता सिनेनिर्मितीत पदार्पण करणार आहे. शिवाय या सिनेमाचे लेखन-संवाद प्रवीण तरडे करणार आहेत. तर त्यांच्या पत्नी स्नेहलप्रवीण तरडे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. आज अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ‘फुलवंती’ या सिनेमाचे या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून यात पखवाज, घुंगरू आणि फुलांचा सुंदर मिलाप पाहायला मिळाला.
तर या सिनेमाबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली की, “फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिल्याने माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन.”
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताची आणि तिच्या या फुलवंतीची चांगलीच चर्चा सुरु आहे.