उत्तम शिक्षण घेत डॉक्टर होऊनही संगीत क्षेत्रात रमलेला शिंदे घराण्यातील बहुगुणी गायक म्हणजेच ‘उत्कर्ष शिंदे’ (Utkarsh Shinde). उत्कर्ष हा प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा आहे. तो जरी पेशाने डॉक्टर असला तरी सुद्धा वडील आणि भावाच्या पावलावर पाऊल टाकत संगीताची आराधना देखील करत आहे.
उत्कर्षचे ‘महामानवाची गौरव गाथा’ हे गाणे खूपच लोकप्रिय झाले. तसेच तो बिग बॉस ३ च्या घरात स्पर्धक म्हणून देखील सहभागी झाला होता. तेव्हा त्याने या रिएॅलिटी शो मधून तमाम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. तसेच उत्कर्षाचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. दरम्यान, उत्कर्षने आपल्या इंस्टाग्रामवरून अभिनेता ‘जितेंद्र जोशी’साठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने जितेंद्र जोशीचे कौतुक केले आहे.
उत्कर्ष शिंदेने त्याच्या या खास पोस्टमध्ये लिहिले की, “निसर्ग तुमच्या उत्कर्षासाठी आपोआप गोष्टी घडवतो असं माझं मत आहे. चार्ल्स डार्विनने ‘सक्षम ते जगतील’ “survival of fittest”असं सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले. माझ्या आयुष्यातही असाच एक चार्ल्स डार्विन आहे. गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती. ”द जितेंद्र जोशी”, “मराठीची समज, संवेदनशील अभिनेता, नीडर वक्ता, रोकठोक व्यक्तिमत्व”; आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती, मग सेक्रेट गेम्स असो किंवा नुकताच आलेला गोदावरी, नाळ २ असो. मराठी सिनेविश्वाला नेहमी त्याच्या अभिनयातून, गीतातून, कवितांमधून वेगळं काही तरी देणारा अवलिया. माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी असलेला कलाकार, व्यक्तिमत्व म्हणजे “द जितेंद्र जोशी.“ नेहमी भेटल्यावर मोठ्या भावाप्रमाणे आधी काळजीपोटी माझ्या खांद्याच्या झालेल्या दुखापतीची विचारपूस करणारा. नुसती विचारपूस नाही तर स्वतः शोल्डर मूवमेंट स्ट्रेंथट्रेनिंग करून घेणारा. उत्कर्ष, तू आता अभिनय क्षेत्रात आला आहेस, खूप काम कर, कामात मज्जा-आनंद घे; जसं चार्ल्स डार्विन सजीवांबद्दल सांगतात.”
View this post on Instagram
तसेच उत्कर्षने पुढे लिहिले की, “जगण्याच्या ह्या स्पर्धेत जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव तग धरून राहतो आणि तोच जीव टिकतो. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असेच जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. असाच काही मला नेहमी नकळतपणे गप्पा मारत मार्गदर्शन करणारा, मराठी सिनेमाची दिशा समजाऊन सांगणारा, कॉम्पिटिशन स्ट्रगल हार्डवर्कबद्दल मार्गदर्शन करणारा, प्रेक्षकांच्या आवडी निवडीबद्दल सतर्कता ठेवत सांगणारा. अभिनय क्षेत्रात दिशा, कन्सिस्टन्सी (नियमितपणा), ह्याचं महत्त्व सांगत संस्कार करणारा, सुतार पक्ष्याचं उदाहरण देत “लगे रेहनेका भाई, बाकी सब हो जाता है”, म्हणजेच सगळं विसरून, कामात झोकून द्यायचं; मग स्वतःची त्या झाडात सुंदर कुपी तयार होतेच. आकाशाला गवसणी घातलेला जमिनीवरचा माणूस, असा हा माझा गुरुस्थानी असलेला मोठा भाऊ, माझा चार्ल्स डार्विन ‘जितू दादा.’”
त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांनी ह्या पोस्टवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच त्याने गायन व अभिनय आणि डॉक्टरकी सोबतच स्वतःचा बिझनेस देखील सुरू केला आहे. उत्कर्षने पंढरपूरमधील वेळापूर येथे स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करून त्याला आदर्श आनंद शिंदे असं नाव दिले आहे.