झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई या भूमिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले. सध्या ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र ती त्यांच्या अभिनयामुळे नव्हे तर त्यांच्या नात्यामुळे… नुकतीच त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत साखरपुडा देखील उरकला. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला. आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची बातमी ऐकायला उत्सुक आहेत. हार्दिक आणि अक्षया सध्या लंडन दौऱ्यावर असून दोघांनी चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.
मात्र तुम्ही समजता तशी ही गुडन्यूज नाहीये. गुडन्यूज अशी आहे की मालिकेतली ही प्रसिद्ध जोडी आता एका सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.. नुकतीच या सिनेमाची घोषणा देखील झाली आहे. ‘चतुर चोर’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे पोस्टर सुद्धा नुकतेच प्रसिद्ध झाले. चतुर चोर हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून त्यांचा विषय अजून उघड झालेला नाही.
लंडनमध्ये नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडल्याचे कळले आहे. याच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी घेतली असून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन हे सहनिर्माते आहेत. अमोल गोळे हे या सिनेमाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण करणार आहेत. सागर पाठक आणि सुमित संघमित्रा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आता या सिनेमाच्या टिझरची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.