पहिला पगार हा सर्वांसाठीचं कायम खास असतो. तसाच तो आपला असो वा आपल्या मुलांचा, आपल्याला आनंद हा कायमच जास्त होत असतो, यात मुळीच शंका नाही. पण जर आपल्या मुलांनी पहिल्या पगारातून आपल्या आई-वडिलांसाठी काही स्पेशल केले तर ते खूपच खास असते अन् त्याचा आनंद गगनात न मावणारा असतो. तर असाच आनंद सध्या कोणाच्या चेहऱ्यावर झळकत असेल तर तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam).
भाऊ कदम आणि त्यांची मुलगी म्हणजेच मृण्मयी कदम कायम चर्चेत असतात. भाऊ कदम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठ आहे. तर आता नुकतचं भाऊ कदम यांना त्यांच्या लाडक्या लेकीकडून एक खास सरप्राईज गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे हे त्यांच्यासाठी खूपच खास आहे. तर त्यांच्या मुलीने देखील कोणत्या दिवसाचं खास निमित्त न शोधता पहिला पगार झाल्याच्या आनंदात हे गिफ्ट दिले आहे.
भाऊ कदम यांची मुलगी डिजिटल क्रियेटर आहे. त्यामुळे सोशलमिडीयावर देखील चांगलीच लोकप्रिय आहे. सोशल मिडीयावर कायम सक्रीय असलेल्या मृण्मयीने नुकताच एक व्हिडीओ सर्वांसोबत शेअर केला. त्यांच्या या व्हिडीओवर सर्वांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच सर्वांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या.
व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “माझ्या खास व्यक्तीसाठी. मी तुमचे खूप आभारी आहे, तुम्ही मला कायम पाठिंबा देता. आज मी इथे आहे, ते फक्त तुमच्यामुळे आणि यासाठी मी अगदी मनापासून कृतज्ञ आहे. तुम्हाला माझा अभिमान वाटेल, अशी मला आशा आहे.”
तसेच पुढे ती म्हणाली की, “माझ्या पहिल्या पगारातून तुम्हाला गिफ्ट द्यावं, असं मला नेहमी वाटतं होतं. मी तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी थोडी बचत केली होती. आता तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते विकत घ्यायला तुमची मुलगी सज्ज झाली आहे. तुम्हाला गिफ्ट्स देणं हे मी कधीच थांबवणार नाही. जरी तुम्ही मला फटकारलंत तरीही मी तुम्हाला गिफ्ट देईन. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.”
तसेच मृण्मयीचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. ज्यावर ७० हजारपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. एवढंच नव्हे तर मृण्मयीचा छोटा व्यवसाय देखील आहे. ‘तरुंध्या’ असं तिच्या व्यवसायाचं नाव आहे; ज्याद्वारे ती ट्रेंडी हेअर बो (स्क्रंचीज)चा व्यवसाय करते. तर तिने नुकतेच वडिलांसाठी ब्रँडेड शूज घेतले आहेत.