‘पुष्पा द राइज’ भाग १ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींहून अधिक कमाई केली. तसेच या चित्रपटातील ‘सामी सामी’ आणि ‘ओ अंटावा’ या गाण्यांपासून ते “झुकेगा नही…”च्या डायलॉग पर्यंत या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये आहे.
तेव्हापासूनच पुष्पाचे चाहते “पुष्पा द रुल” भाग २ ची आतुरतेने वाट पाहत होते. तर आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की, पुष्पा द रुलचे शूटींग सुरू झाले आहे आणि नुकताच शूटींग दरम्यानचा अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.
पुष्पा द रुलचे शूटिंग ३० ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी ‘पुष्पा: द रुल’ म्हणजेच ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनचा पहिला फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “Adventure सुरू झाले आहे …आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचे आभार.”
अल्लू अर्जुनचा हा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पुष्पा २’चे दिग्दर्शन सुकुमार करीत आहेत. तसेच या चित्रपटात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्ना, फहद फासिल आणि विजय सेतुपती दिसणार आहेत.