अनुपम खेर यांना बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत, हिंदी बरोबरच त्यांनी इतर अनेक भाषांमध्ये काम केले आहे. अनुपम खेर हे नेहमीच सोशल मिडियावर सक्रीय असतात. ते अनेकदा त्यांच्या पर्सनल आयुष्यातील काही व्हीडीओ सोशल मिडियावरून पोस्ट करत असतात. अनेकदा त्यांच्या व्हिडीओमध्ये त्यांची आई देखील दिसून येते.
काही महिन्यांपूर्वी अनुपम यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. १९९० साली काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कहाणी यात दाखवली आहे.
नुकताच अनुपम यांचा “मंजिले और भी है” हा टॉक शो सुरु झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अनुपम यांची आई दुलारी खेर यांनी हजेरी लावली होती. त्यांची आई सध्या शिमला येथे राहतात, नुकतीच अनुपम यांनी त्यांच्या आईची मुलाखत घेतली, यामध्ये त्यांच्या आईने त्यांना काश्मीरमध्ये घर हवं अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा अनुपम यांनी त्यांच्या आईला घर घेऊन देण्याचे वचन दिले, तेव्हा त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले.
View this post on Instagram
अनुपम यांनी मुलाखती दरम्यान त्यांच्या आईला विचारले की, “तू मला शिमला येथे घरी नेण्यास का सांगितलेस?” त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “माझ्या काही मौत्रिणी तिथे राहतात आणि माझे पती पुष्करनाथ खेर यांनाही ती जागा आवडायची. पुढे त्या म्हणाल्या, “जर शिमला हा काश्मीरचा भाग असता तर मला तिथे कधीही घर मिळाले नसते.” त्यावर अनुपम म्हणाले, “काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकल्यापासून तुझ्याकडे काश्मीरचे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. म्हणजेच आता तू तिथली रहिवासी आहेस आणि तू काश्मीरमध्ये घर घेऊ शकतेस.”
पुढे दुलारी यांनी, “हे खरोखर शक्य आहे का?” असे विचारले त्यावर अनुपम खेर यांनी होकार दिला. नंतर दुलारी म्हणाल्या, “मग तू तिथे घर घे. बंगला घे. मग आपण शिमलाचे घर भाड्याने देऊ किंवा विकू. मला करण नगरमध्ये तितलीसमोर घर बांधायचे आहे.” त्यानंतर अनुपम खेर यांनी आईला सांगितले की, “काश्मीरमध्ये घर घेण्यासाठी आपल्याला शिमलाचे घर विकायची गरज नाही. आपण आपले हे घर न विकताही काश्मीरमध्ये घर घेऊ शकतो.” असे म्हणत अनुपम खेर यांनी दुलारी यांना काश्मीरमधील आवडणाऱ्या ठिकाणी घर घेऊन देण्याचे वचन दिले. अनुपम यांच्या या बोलण्याने दुलारी भावूक झाल्या आणि त्यांनी अनुपम यांना मिठी मारली.
लवकरच अनुपम यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अनुपम यांच्या सोबत अमिताभ बच्चन, बोमन इराणी, नीना गुप्ता, डॅनी डॅन्झोपा हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाच दिग्दर्शन सूरज बरजातिया यांनी केलं आहे, चार जिवलग मित्रांची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.