बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे विकी कौशल (Vicky Kaushal). आपल्या अभिनयातून आणि कलेतून त्याने कायम सर्वांचे मन जिंकले. तर आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत विकी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे.
ऐतिहासिक सिनेमे म्हणजे आपसूक लक्षात येते की सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित असणार. तर विकीचा आगामी सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आणि धगधगत्या आयुष्यावर आधारित आहे. त्याच्या आगामी सिनेमाचे नाव ‘छावा: द ग्रेट वॉरियर‘ (Chhava : The Great Warrior) असे आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून विकीच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे या सिनेमातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.
विकी कौशलच्या छावा या आगामी सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु आहे. परंतु सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच्या कोणत्याच गोष्टी त्याने अद्याप सोशल मीडियावर शेअर केल्या नाही. त्यामुळे सिनेमात विकीचा लूक नक्की कसा असेल याची सर्वजण वाट पाहत होते. तर चाहत्यांची ही इच्छा देखील आता पूर्ण झाली आहे. छावा सिनेमातील विकीचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. पण हा लूक त्याने शेअर केला नसून शूटिंग दरम्यान हा फोटो लीक झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लूकमध्ये विकीचा कधीही न पाहिलेला अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला. यावेळी तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमासाठी विकी कौशलने घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी अशा अनेक गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं आहे.
View this post on Instagram
कपाळाला गंध, गळ्यात रुद्राक्षाची आणि कवड्याची माळ, कमरेला शेला, धोतर असा पेहराव विकी कौशलचा पाहायला मिळाला. फोटो समोर येताच हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. त्याच्या या लूकवर सर्वांनी भरभरून प्रेम दिले. छावा या सिनेमात विकीसह रश्मिका मंदानादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात रश्मिका छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसुबाई भोसले यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. छावा या सिनेमातून विकी आणि रश्मिका यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमातील रश्मिकाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. शूटिंग संपल्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने विकी कौशलचं कौतुक देखील केलं होतं. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे आभार देखील मानले.
विकी कौशल आणि रश्मिका यांच्यासोबतच आशिष पालांडे, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर हे कलाकार देखील छावामध्ये झळकणार आहे. नुकतंच संतोष जुवेकरचं शूटिंग देखील संपले. पोस्ट करत त्याने सुद्धा “अखेर माझं शूट संपलं.” हे जाहीर केले. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लक्ष्मण उतेकर सांभाळत आहेत. तर हा सिनेमा यंदा ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.