सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर चित्रपट आणि मलिकांपासून थोडी लांबच आहे. आतापर्यंत ‘एक तारा’, ‘दिया और बाती हम’ या हिंदी मालिकांमधून तर ‘दुहेरी’, ‘बन मस्का’ या मराठी मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली.
ती काही महिन्यांपासून कोणत्याही चित्रपटांमध्ये किंवा मालिकेमध्ये दिसली नाही. असे असूनही ना कधी प्रेक्षक तिला विसरले, ना कधी तिची चर्चा कमी झाली. त्याचे कारण म्हणजे ती एक यूट्यूबर आहे. त्यामुळे ती तिच्या सोशल मीडियावरुन आणि खास करून तिच्या यूट्यूब चॅनलवरुन ती प्रेक्षकांच्या कायमच संपर्कात असते.
उर्मिला निंबाळकरचे आठ लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स.
उर्मिला निंबाळकर ही सर्वाधिक लोकप्रिय यूट्यूबरपैकीं एक असून तिच्या यूट्यूब चॅनेलचे आठ लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत. ती तिच्या या चॅनेलवरुन ट्रॅव्हल्स, लाईफ स्टाईल, स्किन केअर आणि दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या टिप्स देत असते. महत्वाचं म्हणजे ती मराठी सिनेसृष्टीतील पहिलीच अभिनेत्री आहे जिने स्वतःचा स्टुडिओ बनवला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने मालिका विश्वापासून दूर राहण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. तेव्हा उर्मिलाने सांगितले की, “मालिकांमध्ये काम करत असताना मी दिवसातले कमीतकमी १४ तास तर कधीकधी १७ ते १८ तास सलग शूटिंग करायचे. हे सगळ्याच मालिकांच्या बाबतीत घडतं असं माझ्या लक्षात आलं. या जीवशैलीचा माझ्या स्वतःच्या आरोग्यावर प्रचंड परिणाम व्हायला सुरुवात झाली. मी जर कधी आजारी पडले तरी औषध घेऊन, सलाईन लावून मला काम करायला लागायचं.”
हे काम आपण फक्त पैसे मिळवण्यासाठीच करायचंय का?
तसेच ती पुढे म्हणाली की, “मला काम भरपूर मिळत होतं पण मला ते करायचं नव्हतं. याचं कारण म्हणजे अशा पद्धतीने काम करून आपलं असं आयुष्यच नसणं मला मान्य नव्हतं. ते काम करून मी अजिबात खुश नव्हते. त्याचप्रमाणे त्यावेळी ओटीटी हे माध्यमही लोकप्रिय होत होतं आणि त्यामुळे मालिकांमध्ये काम करताना कामाचं खूप प्रेशर होतं. मी ज्या प्रकारच्या मालिकेत काम करते त्यापेक्षा खूप वेगळा कॉन्टेन्ट मी प्रेक्षक म्हणून बघायचे. म्हणून मला असं वाटायचं की हे काम आपण फक्त पैसे मिळवण्यासाठीच करायचंय का? आपल्या कामातून आपल्याला समाधानही मिळायला हवं. या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे माझी इतक्या वेळा तब्येत बिघडायची की मला भेटण्यासाठी माझ्या आई बाबांना दवाखान्यात यायला लागायचं. त्यामुळे मी मालिकांमध्ये काम करणं थांबवलं.”
उर्मिला निंबाळकर सध्या करत असलेले व्हिडिओ देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. त्यामुळे तिचं कायमचं कौतुकही होत आले आहे.