भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील जनतेला त्यांचे हक्क आणि देशाला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘परिनिर्वाण’ हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनाशी संबंधित असलेला सिनेमा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित असला तरी तो बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित नसून त्यांच्या महापरिनर्वाण दिनाला कॅमेरात कैद करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यावर आधारित आहे. हा सिनेमा म्हणजे बायोपिक नाही तर ६ डिसेंबर १९५६ रोजी नक्की काय घडले याचे साक्षीदार असणाऱ्या आणि सर्व काही कॅमेरात कैद करणाऱ्या ‘नामदेव व्हटकर’ यांची कथा या सिनेमात उलगडणार आहे.
या सिनेमात नामदेव व्हटकर यांच्या प्रमुख भूमिकेत प्रसिध्द अभिनेता ‘प्रसाद ओक’ झळकणार आहे. यापूर्वी प्रसादने धर्मवीर मध्ये साकारलेली आनंद दिघे साहेब यांची भूमिका पाहून फक्त सिनेसृष्टीनेच नाही तर राजकीय क्षेत्र आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले होते. त्या सिनेमा नंतर प्रसाद या सिनेमात दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ते पाहून अंगावर शहारा येत आहे.
View this post on Instagram
या सिनेमातील भूमिकेबद्दल बोलताना प्रसादने सांगितले की, ”जेव्हा एखादा सिनेमा माझ्याकडे येतो तेव्हा मी माझी भूमिका बघण्याआधी सिनेमा काय आहे, ते बघतो मग त्या सिनेमात माझी व्यक्तिरेखा काय करतेय, ते बघतो. या चित्रपटाची संहिता ऐकताना पहिल्या पानापासून काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्याचे जाणवले. मला नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारायला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो.”
तसेच पुढे म्हणाला की, “नामदेव व्हटकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. प्रत्येक वाटेवरचा त्यांचा प्रवास अत्यंत अवघड होता आणि लेखकाने तो अतिशय सुंदर गुंफला आहे. ती सुंदरता आणि सहजता पेलवून नेण्याकरता माझा कस लागणार आहे. परिनिर्वाण झाल्यानंतर मोक्ष मिळतो. मात्र त्यासाठी माणसाला मृत्यू यावा लागतो. परंतु मला जीवंतपणी परिनिर्वाण करायला मिळणार आहे. ही कलाकृती आम्ही उत्तम करू शकलो तर प्रेक्षकांना आणि आम्हालाही समाधानाचा मोक्ष मिळणार आहे”.
प्रसादचा हा आगामी सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अजूनही समोर आलेले नाही.