‘दहाड’ ही वेबसिरीज ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली असून सध्या ती सोशल मिडीयावर खूप चर्चेत आहे. या सिरीजमध्ये सोनाक्षी सिंन्हा, विजय वर्मा, सोहम शाह आणि गुलशन देवय्या हे चौघे मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीजमध्ये विजय वर्मा यांनी मोहनची भूमिका साकारली आहे.
नुकतीच प्रदर्शित झालेली ‘दहाड’ ही वेबसिरीज सायनाईड मोहन या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. अगदी रंजकपणे मोहनचा जीवनपट या वेबसिरीजमध्ये उलगडून दाखवण्यात आला आहे. मोहन हा शिक्षक असून तो अविवाहित आहे. अनेक मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याशी शारीरिक संबंध तो ठेवत असे. आपण पळून जाऊन लग्न करू असे फसवत तो मुलींना स्वखुशीने घरातील दागिने व पैसे घेऊन त्याच्या सोबत पळून जाण्यासाठी तयार करत असतो. पण मोहन मात्र त्या मुलींना सायनाईड देऊन त्यांची हत्त्या करत असे व त्यांच्याकडील दागिने आणि पैसे घेऊन तिथून पळ काढत असे.
सायनाईड मोहनचे खरे नाव मोहन कुमार असे होते. हा मुलींना त्याच्या जाळ्यात ओढून अतिशय क्रूर प्रकारे त्यांची हत्त्या करत असे. तो थंड डोक्याने खून करणारा अपराधी होता. २५ ते ३० वर्षीय मुलींना हेरून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची हत्त्या करत असे २००३ ते २००९ या साली त्याने कर्नाटकातील २० मुलींची हत्त्या केली. त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत त्यांना गर्भनिरोधक गोळीद्वारे सायनाईड देऊन मारले. अनेक क्रूर गुन्हे करणाऱ्या या मोहनच्या गुन्हेगारीचा छडा कसा लागतो याचा प्रवास या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे.