मराठी सिनेसृष्टीतील अभिनेताआणि दिग्दर्शक ‘प्रसाद ओक’ त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि त्याच्या उत्तम दिग्दर्शनामुळे कायम चर्चेत असतो.
‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ या सिनेमाच्या भरघोस यशानंतर प्रसाद आता पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत तो दिग्दर्शन करीत असलेल्या एका नव्या कोऱ्या सिनेमाची आणि कहाणीची घोषणा केली. तर तो सिनेमा म्हणजे ‘वडापाव : एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’.
जागतिक वडापाव दिनानिमित्त प्रसादने ‘वडापाव’ या सिनेमाबद्दल आणखी माहिती दिली. त्यानुसार या सिनेमात दिग्दर्शनासोबतच प्रसादने महत्त्वाची भूमिका बजावण्याचे देखील ठरवले आहे. या सिनेमात प्रसाद ओकसह गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार देखील त्यांच्या अभिनयाने वडापावची चव वाढवणार हे नक्की.
तर हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रसादने आणखी एका सिनेमाची घोषणा केली. प्रसादचा ‘जिलबी’ हा सिनेमा देखील आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नितीन कांबळे करत असून प्रसाद या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. त्याचे येणारे हे दोन्ही सिनेमे खाण्यासंबंधित असल्यामुळे या सिनेमांनी प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे परीक्षण करण्याचे काम प्रसादकडे आहे. याच कार्यक्रमातील कलाकार प्रसादकडे पार्टी मागून दमले. त्यांच्या पार्टीचा बेत कधी आखला जाणार हे सांगणं जरी अवघड असलं तरी रसिक प्रेक्षकांना आपल्या सिनेमाची मेजवानी देण्याचा दिग्दर्शक प्रसाद ओक चांगलाच बेत दिसतोय. त्यामुळे त्याच्या या रुचकर मेजवानीत आणखी कोणकोणते सिनेमे चाखायला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
तसेच प्रसाद ओकचे हे सिनेमे कधी प्रदर्शित होणार आणि या सिनेमांत कोणत्या मसाल्यांची फोडणी असणार हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Also Read: Did you know Dilip Joshi once shared room with Salman Khan?